पारनेर । नगर सहयाद्री:-
पळशी ता. पारनेर येथील आश्रम शाळेतील गैरप्रकारची विधानभेत मांडणी करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पारनेर- नगर मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना पळशी आश्रम शाळेतील सुरु असलेला गैरप्रकार मांडला.
यावेळी आ. दाते म्हणाले, ग्रामीण भागातील आदिवासी मुला-मुलींसाठी पळशी (ता.पारनेर) येथे निवासी आश्रम शाळा सुरू आहे. आश्रम शाळेत दोन-तीन दिवस पाणी येत नाही, आश्रम शाळेतील मुलांना फिल्टरचे पाणी मिळत नाही, मुलांना खाण्यासाठी आलेले केळी, बटाटा, वांगी, फ्लावर खराब झालेले उघडकीस आले आहे, पिण्याच्या पाण्याच्या हौदात किटक आढळले आहे.
जेवणात एक्सपायरी झालेले पदार्थ वापरत असल्यामुळे मुला मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच दहावीची परीक्षा दोन महिन्यावर आल्या असल्या तरी अद्याप गणित व इतर विषयाचे पाठ शिकवले जात नसल्याने निदर्शनास आले आहे. यामुळे आश्रम शाळेतील मुलांची गुणवत्ता ढासळली आहे. आश्रम शाळेच्या आवारात बाहेरचे पुरुष कामगार रहात आहे.
तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने मुलींच्या सुरक्षेतेचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आश्रम शाळेची चौकशी करून दोषींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, तसेच मुला मुलींसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत केली आहे.
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
यापूर्वीही देखील आश्रम शाळेतील कारभाराबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. पळशी गावच्या ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचीही नोटीस प्रकल्प अधिकारी यांना दिली होती, वर्तमानपत्रातही त्याची बातमी आल्या होत्या परंतु निगडित अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे सदर कारभारास जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे पारनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आश्रम शाळेत गैरप्रकार
आमदार दाते सरांनी पळशी आश्रम शाळेतील मुलींच्या सुरक्षेतेचा प्रश्न विधानसभेत घेऊन संवेदनशील नेता असल्याचे दाखवले, मी या आश्रम शाळेला भेट दिली होती. येथे अतिशय गैरप्रकार आहे, येथील जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. मुलींच्या वस्तीगृहातवर महिला कर्मचारी नाही, येथील माहिती बाहेर दिल्यास मुख्याध्यापिका त्रास देतात अशी माहिती मिळाली. मुलींच्या वस्तीगृहासमोर बाहेरचे काम करणारे लोक राहतात ही अतिशय गंभीर बाब आहे.
– सुषमा रावडे, ( तालुकाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)