आमदार संग्राम जगताप यांचा इशारा; अधिकार्यांच्या बैठकीत नगररचना विभागाच्या अनागोंदीबद्दल तक्रारींचा पाऊस
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगररचना विभागाचा कारभार स्वच्छ, पारदर्शक व नियमांनी होण्यासाठी विभागातील सर्व अधिकार्यांच्या तात्कळ बदल्या कारा, प्रलंबित सर्व प्रकरणे तातडीने मंजूर करा, विभागाचा मनमानी, हुकूमशाही व अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी आयुक्तांनी तातडीने कठोर पाऊले उचलावीत. प्रकरणे मंजूर करताना जर आर्थिक तडजोडी केल्या, फायली अडविल्या तर आयुक्तांसह सर्व अधिकार्यांविरोधात मी स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करेन, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी देऊन नगर रचना विभागाच्या अधिकार्यांसह आयुक्तांनाही चांगलेच धारेवर धरत जाब विचारला व तीव्र नाराजीही व्यक्त केली.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या वाढत्या तक्रारींबाबत आमदार संग्राम जगताप यांनी २० मार्चला थेट विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडत कारभार सुधारण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी बुधवारी अहिल्यानगरच्या शासकीय विश्रामगृहावर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह नगरराचाना विभागातील सर्व अधिकारी, क्रेडाई संघटना, इंजिनियर आर्किटेक असोसिएशन व बांधकाम क्षेत्रातील व्यवसायिकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक व कडक भूमिका घेऊन नगररचना विभागाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला.उपस्थित महापालिका आयुक्त यशवंत डांगे व नगररचना विभागातील सर्व अधिकार्यांना नियमानुसार पारदर्शक चांगाला कारभार होण्यासाठी सूचना केल्या. यावेळी क्रेडाई संघटनेचे राज्य सचिव आशिष पोखरणा, अहिल्यानगरचे अध्यक्ष अमित मुथा, सचिव प्रसाद आंधळे, आर्किटेक्ट्स इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष आदिनाथ दहीफळे, समिती प्रमुख रत्नाकर कुलकर्णी, माजी अध्यक्ष अनिल मुरकुटे, उपाध्यक्ष विनोद काकडे, माजी उपमहापौर गणेश भोसले व राजेश भंडारी आदींसह मोठ्या संख्येने अहिल्यानगरमधील बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीत सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी व बांधकाम व्यवसायिकांनी नगररचना विभागाच्या कारभाराबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी करून होत असलेल्या अडवणुकीबद्दल माहिती दिली.
आमदार जगताप यांनी, आयुक्त यशवंत डांगे हे महानगरपालिकेचे पालक आहेत. त्यामुळे नगररचना विभागाचा व एकंदरीत मनापाचा कारभार सुधारण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. त्यामुळे आपल्या अधिकाराचा वापर करून तत्काळ उपाययोजना कराव्यात. शासनाकडे तक्रार व चौकशी करण्याची वेळ अणू नका. तुम्हाला त्रास देण्याची आमची भूमिका नसून शहरात प्रलंबित कामे मार्गी लागून शहराचे चांगले व्हावे यासाठीच तळमळ आहे, असे सांगून मनापा आयुक्तांना विविध सूचना केल्या. सर्व बांधकाम व्यावसायिकांनी नियमाप्रमाणे व मंजूर नकाशाप्रमाणे कामे करावीत. ओढे नाले बुजवून ले आउट करू नका.
यावेळी गणेश भोसले यांनीही अधिकार्यांच्या कारभारावर नाराजी व्यकत केली. ते म्हणाले, आमदार जगताप रक्ताचे पाणी करत राज्य सरकारशी भांडून शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणत आहेत. त्यातून शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाकडे नगररचना विभागातील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यावेळी क्रेडाई संघटनेचे राज्य सचिव आशिष पोखरणा यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त करीत अनेक तक्रारी मांडून नगररचना विभागातून होत असलेल्या अडवणुकीमुळे व अर्थकारणाने शहरातील बांधकाम प्रकल्पांना कशी दिरंगाई होत आहे हे पुराव्यानिशी सांगतले.
यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांनी बैठकीचा समारोप करताना सांगितले की, आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवून काही अधिकार्यांची बदली करणार आहे. विभागातील मनुष्यबळ वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे. तसेच आलेले नवे व प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मंजूर करून या बैठकीत ज्या मागण्या व तक्रारी झाल्या आहेत त्यावर येत्या १० दिवसात मार्ग काढू, आश्वासन दिले.
तर मनपाला मिळतील तब्बल १४२ कोटी
बैठकीत आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशनचे रत्नाकर कुलकर्णी यांनी नगररचना विभागात आर्थिक व इतर कारणांनी शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. जर या प्रकरणांना मंजुरी दिलीतर मनपाला तब्बल १४२ कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो, असे म्हटले. एकीकडे मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे वारंवार सांगण्यात येते. दुसरीकडे एव्हढ्या मोठ्या महसूल उत्पन्नाकडे दुर्लक्ष करत उदासीन भूमिका घेत असल्याचा विरोधाभास कुलकर्णी यांनी आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिला.