भावीकांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते सर यांचे केले कौतुक
निघोज | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रा उत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा मुख्य यात्रा उत्सव सोमवार दि.21 पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला असून पहाटे देवीचे पुजारी गायखे बंधू यांनी देवीची पुजा केली. त्यांनतर महाआरतीने या यात्रा उत्सवाची सुरुवात झाली. नळपाणी पुरवठा योजना असलेला कपिलेश्वर बंधारा पाण्याअभावी चार दिवसांपूव उघडा पडला होता. गावची लोकसंख्या 25 हजार आसपास असल्याने गेली आठ दिवस निघोजकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्नशील होते.
मात्र निघोज ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच मुंबईकर मंडळ यांनी कपिलेश्वर बंधाऱ्यात पाणी आले तरच भावीक व ग्रामस्थ यांची व्यवस्था होऊ शकते ही भुमिका राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे प्रकर्षाने मांडली. कालवा सल्लागार समीतीचे सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनीही वरिष्ठ पातळीवर चर्चा करीत मंत्री विखे पाटील व आमदार दाते यांच्याकडे पाठपुरावा केला. यासाठी निघोज ग्रामपंचायत सर्वेसर्वा सचिन पाटील वराळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब लामखडे, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास लामखडे, माजी उपसरपंच उमेश सोनवणे यांच्यासह अनेकांनी पाठपुरावा केला होता.
मंत्री विखे पाटील, आ. दातेंचे मानले आभार
गेली दोन दिवसांपूव मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते यांनी हे पाणी सोडण्याच्या सुचना दिल्याने बंधाऱ्यात शनिवारी सायंकाळी सात वाजता पाणी आले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन योग्य ते नियोजन केल्याने अवघ्या चोवीस तासांत हे पाणी जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड या ठिकाणी गेले आहे. ग्रामस्थ भावीक व यात्रेकरू यांनी मंत्री विखे पाटील व आमदार दाते यांचे आभार मानले आहेत. निघोजचा यात्रा उत्सव शनिवार दि.26 पर्यंत सुरू असल्याने आठवड्यात किमान या यात्रा, जत्रा, उरुस व जयंती उत्सवासाठी जवळपास पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती असते.