spot_img
अहमदनगरनगरमध्ये सक्रिय झाला मालेगाव पॅटर्न!; हिरवा गुलाल कुणाच्या अंगावर?

नगरमध्ये सक्रिय झाला मालेगाव पॅटर्न!; हिरवा गुलाल कुणाच्या अंगावर?

spot_img

खा. निलेश लंकेच्या विजयात किंगमेकर ठरलेल्या मुस्लिम मतांची एकगठ्ठा साथ कोणाला मिळणार? / निलेश लंकेच्या अंगावर पडलेला हिरवा गुलाल, अभिषेक कळमकर यांच्याही अंगावर पडणार का?

सारिपाट / शिवाजी शिर्के
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील लक्षवेधी लढत नगर दक्षिण मतदार संघात पाहायला मिळाली. देशात जरी हिंदुत्ववादी नरेंद्र मोदींचे भाजप प्रणित सरकार आले असले तरी देखील नगर दक्षिणेत मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निलेश लंके हे खासदार झाले. सुमारे २९ हजार मतांच्या फरकाने विजयी झालेल्या लंके यांच्या विजयात विशेषत: अल्पसंख्यांक मुस्लिम मतदारांनी किंगमेकरची भूमिका वठवली होती. त्याच मुस्लिम मतदारांची एकगठ्ठा साथ आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार्‍या अभिषेक कळमकर यांना मिळणार की त्यातील काही वाटा संग्राम जगताप यांच्या पारड्यात पडणार हे पहावे लागणार आहे. कळमकर यांच्यासाठी नीलेश लंके यांनी मुकुंदनगर, झेंडीगेट या मुस्लिमबहुल पट्ट्यात स्वत: लावलेली फील्डिंग, बैठकांचे सुरु केलेेले सत्र पाहता नगर शहर विधानसभा मतदारसंघात मालेगाव पॅटर्न सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात चार वेळा मुख्यमंत्री असताना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष स्थापनेपासून सत्तेमध्ये ज्या ज्या वेळी शरद पवार होते त्या त्या वेळी त्यांनी मुस्लिम हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आपसूकच याचा फायदा जसा लंके यांना झाला तसा कळमकर यांना होईल असे गृहीत धरले जात आहे. गत लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांच्या ७६ हजार मतांमधून अल्पसंख्यांक मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांची पडलेली सुमारे ३५ हजार मते वजा केली तर अल्पसंख्यांकां व्यतिरिक्त नीलेश लंके यांना पडलेल्या मतांचा आकडा हा अवघा ४० हजार एवढाच आहे. तर दुसरीकडे भाजप उमेदवार विखे यांना अल्पसंख्यांक मतांची अजिबात साथ मिळाली नसली तरी देखील त्यांना १ लाख ५ हजार मतांसह तब्बल ३० हजार मतांची आघाडी नगर शहरातून मिळाली होती.

मुकुंदनगरमुळे निलेश लंके यांचा विजय!
लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना शहर विधानसभा मतदारसंघात तब्बल १ लाख ५ हजार मते मिळाली. लंके यांना सुमारे ७६ हजार मते मिळाली. लंके यांचा २९ हजार मतांनी विजय झाला. अहमदनगर शहरातून मुस्लिम समाजाच्या एकूण झालेल्या मतदानापैकी जवळपास ९९ टक्के मतं ही एकट्या लंके यांना मिळाली. त्यांची बूथ निहाय आकडेवारी पाहिल्यास ती लंके यांच्या विजयासाठी निर्णायक ठरलेल्या २९ हजार एवढी आहे. त्यामुळेच मुस्लिम मतदारांनी एकतर्फी लंके यांना साथ दिल्यामुळे अटीतटीच्या लढाईत भाजपचा जिव्हारी लागणारा पराभव झाला.

मालेगावमुळे मविआच्या झोळीत विजय!
सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळत गेल्याने भाजपचा बालेकिल्ला अशी प्रतिमा निर्माण झालेल्या धुळे लोकसभा मतदार संघात यावेळी झालेल्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर मात करण्याचा चमत्कार केला होता. मालेगाव मध्य या मुस्लिमबहुल विधानसभा मतदार संघाने महाविकास आघाडीच्या उमेदवारावर मतांचा अक्षरश: पाऊस पाडला. त्याचे पर्यवसन अर्थातच भाजपच्या पराभवात झाले. धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा यासह उर्वरित दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून भाजप उमेदवार तब्बल १ लाख ९५ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर होता. मात्र जेव्हा राज्यात अल्पसंख्यांक मतदारसंघ म्हणून ओळख असणार्‍या मालेगाव विधानसभा मतदार संघाची मोजणी सुरू झाली तेव्हा कलाटणी मिळाली. मालेगावात एकूण २ लाख ५ हजार एवढे मतदान झाले. त्यापैकी मविआ उमेदवाराला १ लाख ९८ हजार ८६९ मते मिळाली. भाजपला येथून जेमतेम साडे चार हजारांचा टप्पा गाठणे शय झाले. मुस्लिम मतांमुळे भामरे यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला.

मालेगावची पुनरावृत्ती नगरमधील मुकुंदनगर करणार का?
निलेश लंके यांची मुकुंदनगर भागात मोठी लोकप्रियता आहे. अहमदनगरचे मालेगाव अशी मुकुंद नगरची ओळख आहे. ज्या पद्धतीने भाजप उमेदवाराचा जिव्हारी लागणारा पराभव मालेगावच्या मतदारांमुळे झाला तसाच पराभव नगर दक्षिणेत भाजप उमेदवाराचा मुकुंदनगर लंके यांच्या पाठीशी एकमुखी उभा राहिल्यामुळे झाला. आता त्याच भागातील मतदारांची साथ महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मिळत आहे. त्यामुळे लंकेच्या अंगावर पडलेला हिरवा गुलाल, आता कळमकर यांच्याही अंगावर पडल्यास आश्चर्य वाटू नये.

हिरव्या अन् भगव्या वादात घडलेल्या जातीय दंगलींच्या
आठवणीने व्यापार्‍यांसह नगरकर आजही होतात भयभित!
जातीय दंगलींचा वणवा मुंबई, ठाणे, मालेगाव, तत्कालीन औरंगाबाद या शहरांप्रमाणे नगर शहरात देखील पेटयाचा! त्या वणव्याचा तडाखा अनेकांना बसला! त्याची धग बसलेली अनेक कुटुंबे आजही त्यात होरपळताना दिसत आहेत. जाळपोळ आणि संचारबंदीच्या तडाख्यातील व्यापार्‍यांपैकी काहींनी नगर शहर सोडले. शिवसेनेचे तत्कालीने नेते अनिल राठोड यांनी अत्यंत खंबीर भूमिका घेत नगर शहरातील हिंदुंना आधार देण्याचे काम केले. नगर शहरातील त्या दंगलीच्या आठवणीने आजही अनेकांच्या अंगावर काटे उभे राहतात. त्या-त्यावेळी घडलेल्या या जातीय दंगलीत सर्वाधिक फटका बसला तो व्यापार्‍यांंना, दुकानदारांना आणि छोट्या व्यावसायिकांना! गेल्या काही वर्षात दोन समाजात तेढ कमी होत गेली आणि त्यातून सामाजिक स्वास्थ्यही जपले जाऊ लागले. त्यामुळेच अलिकडे जातीय दंगली घडल्या नाही. दोन्ही समाज गुण्यागोविंदाने एकत्र असल्याचे दिसते. मात्र, असे असले तरी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजात असुरक्षीततेची भावना निर्माण झाल्याचे स्पष्टपणे समोर आले. त्यातूनच हा समाज संघटीत झाला आणि मतदानाला बाहेर पडला. भाजपा महायुतीच्या विरोधात मतदान करताना या समाजाने आपण किती निर्णायक आहोत हे मतदानातून दाखवून दिले. आपण ठरवू त्याला आपण पाडू शकतो ही भावना कोणत्याही वर्गात, जातीत वाढीस लागली की त्यातून सामाजिक तेढ निर्माण होण्याचा धोका सर्वाधिक असतो. हा संभाव्य धोका नगरमध्ये कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि त्यातूनच मग गेल्या काही वर्षात शांत दिसणार्‍या नगर शहराचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलं जाऊ शकतं!

जामखेडचा पीआय झाला
रोहीत पवार यांचा बटीक
स्वयंसेवी संस्थेने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार!
विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वाधिक वेगाने वाहत आहेत ते जामखेड- कर्जतमध्ये! निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. कोणाचाही मुलाहीजा न बाळगता कारवाई करण्याचेही सांगितले आहे. मात्र, असे असताना जामखेडचा फौजदार राजकीय पक्षाचा बटीक झाल्यागत काम करत असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. गरीबांचा दिवाळीचा शिधा रेशनकार्डवर न येण्याचे कारण ठरले आदर्श आचारसंहिता! मग, असे असताना जामखेडमध्ये रोहीत पवारांची आरोग्याचे उपचार करणारी रुग्णवाहिका रस्त्यावर फिरतेच कशी? मुळात या रुग्णवाहिकेला राज्याच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे काय? दिलीच असेल ती कोणत्या निकषाने दिली? रुग्णवाहिकेतून रुग्णांची तपासणी करणे, त्यांना औषधे देणे हे काम करण्यास कोणी परवानगी दिली? जनतेच्या आरोग्याशी थेटपणे खेळ मांडण्याचे काम रोहीत पवार करत असताना त्यावर आजपर्यंत कारवाई का झाली नाही हा खरा प्रश्न आहे. आचारसंहिता चालू असताना काही जागरुक नागरीकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी ही रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचे आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करणे यात गैर काहीच नाही! जामखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक असणारे महेश पाटील यांना खर्डा चौकात ही रुग्णवाहिका असल्याची माहिती मिळाल्यानंतर ती ताब्यात घेण्याऐवजी या महेश पाटीलने भाजपाची रुग्णवाहिका शोधण्याचे फर्मान सोडले! महेश पाटील हे एखाद्या कसलेल्या राजकीय पुढार्‍यासारखे जामखेडमध्ये राजकीय खेळ खेळताना सार्‍यांनीच पाहिलेय! रोहीत पवारांच्या रुग्णवाहिकेवर कारवाई करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हतेच! कारण, गेल्या काही महिन्यात ते बटीक झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांनी हे टाळण्यासाठी राम शिंदे यांची रुग्णवाहिका शोधून आणण्याचे फर्मान सोडले. लागलीच खास दूत रवाना झाले आणि राम शिंदे यांचीही रुग्णवाहिका पोलिस ठाण्यात आणली गेली. दोन्ही बाजूंनी मग वाद सुरु झाला! एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरु लागली. महेश पाटील गालातल्या गालात हसत बसले आणि दुसर्‍या क्षणाला रोहीत पवार समर्थकांकडे पाहत इशारे करु लागल्याचे लपून राहिले नाही. कारवाई न करता स्टेशन डायरीला नोंद घेणार्‍या महेश पाटील यांच्या हेतूबद्दल आता सार्‍यांनाच शंका येऊ लागली आहे. तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला आता जबाबदार असणार ते हेच महेश पाटील! आचारसंहिता भंगाचा प्रकार स्पष्टपणे समोर आलेला असतानाही राजकीय पक्षाचा बटीक झाल्यागत काम करणार्‍या या महेश पाटील याच्याविरोधात आता सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे महेश पाटील याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने आता त्याच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, हे सारे घडले असताना जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडून त्याआधी या महेश पाटीलवर काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

डॉ. सुजय विखे यांच्या ग्रहमानाच्या
जोडीने शिजलेलं पातेल्याची गोष्ट!
थेटपणे भाष्य करताना कोणाचाही मुलाहीजा न ठेवणारे अशी ओळख असणार्‍या माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत जोरदार फटकेबाजी केली. महाविकास आघाडीच्या राज्यातील नेत्यांवर सडकून टिका करणार्‍या सुजय विखे पाटील यांनी शिवाजीराव कर्डिले यांचे कौतुक केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी खुमासदार किस्से सांगत त्यांच्या विरोधात येणार्‍या अडचणींचा पाढाही वाचला! लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, असं सुजय विखे पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला, असं सुजय विखे म्हणाले. यानंतर त्यांनी संगमनेरच्या घटनेचा संदर्भ दिला. माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली, असं म्हणताच सभेत चांगलाच हशा पिकला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभेला उमेदवारी का केली संदेश कार्ले यांनी स्पष्टच सांगून टाकले; महिलांना अश्रू अनावर, संदेश आमचा…

शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी - संदेश कार्ले | गावसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद | नगर...

श्रीगोेंद्यातून मीच पुन्हा आमदार होणार; राहुल जगताप नेमकं काय म्हणाले पहा..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री प्रचारादरम्यान श्रीगोंदा- नगरमधील मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता नागवडे-पाचपुते या दोघांही विरोधकांना...

पगारी कर्मचार्‍यांच्या उर्मटपणाने गावागावात दहशत

मतदारसंघ ही कार्पोरेट कंपनी नसल्याचे सांगण्यास सरसावले कर्जत- जामखेडकर! कुटुंब अन् कर्मचार्‍यांपलिकडे गावागावातील पदाधिकार्‍यांचा...

आमदार संग्राम जगताप यांच्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटलांचे मोठे विधान; लीड बद्दल नेमकं काय म्हणाले पहा…

महायुतीची घटक पक्षाची बैठक संपन्न अहिल्यानगर / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांनी...