बीड । नगर सहयाद्री:-
बीडच्या शिरूरकासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि खोक्याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच येथील पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले आहेत.
या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी झाले आहेत. सकाळी 9 वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला आहे. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे. या मोर्चात एकूण सहा मागण्या करण्यात आल्या. या मोर्चात ढाकणे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
सतीश भोसले उर्फ खोक्या आणि त्याचे सहकारी हरणाची तस्करी करणे, त्यातून भरपूर पैसे कमवणे हा मुख्य व्यवसाय करतात. त्यासाठी त्याला वनविभागाचा राजकीय वरदहस्त असून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. तसेच वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. ढाकणे कुटुंबीयाला मारहाण झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धोकरट यांनी ढाकणे कुटुंबाची तक्रार घेतली नाही. यामुळे ढाकणे कुटुंबाला पोलीस अधीक्षकांकडे जावे लागले.परंतु त्या ठिकाणीही तक्रार घेतली नाही, याबाबतची चौकशी करावी.
या सर्व घटनाक्रमामध्ये ओबीसी समाजाच्या गरीब कुटुंबावर पोलीस प्रशासनाकडून अन्याय कोणाच्या दबावाखाली झाला. याबाबतची चौकशी करावी. आमदार सुरेश धस आरोपीस वाचवण्यासाठी उघड सहकार्य करत असल्याचे दिसून येत असताना त्यांना सहआरोपी करावे. यासह सतीश भोसले यांचे आणखी कुठले अवैधधंदे आहेत. या सर्वांचा शोध घ्यावा. अशा मागण्या केल्या आहे.