बीड / नगर सह्याद्री –
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. परंतु वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. तो खंडणीच्या आरोपात अटक असून याचा पोलिस तपास करत आहेत.
सातही आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई
दरम्यान, संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक केली आहे. आता अखेर देशमुख हत्या प्रकरणात सातही आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.
कृष्णा आंधळे अद्यापही फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन आरोपी फरार होते. यातील दोन आरोपींना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. तर एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्यावरही पोलिसांनी मोक्का लावला आहे. कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात केली आहेत. परंतु अद्यापही त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.