पारनेर । नगर सहयाद्री:-
श्री गोरेश्वर पतसंस्थेमधील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. ठेवीदाराचा विश्वास संपादन करत बंद खात्याचे चेक देवुन ११ लाख २० हजारांची आर्थिक फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी ठेवीदार फिर्यादी नारायण पांडुरंग मुळे (रा. पारनेर, जि. अहिल्यानगर ) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अंबादास शिवराम नरसाळे, सुलभ अंबादास नरसाळे (दोघे मु.रा गोरेगाव ता. पारनेर ) या पितापुत्रांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतसंस्थेतील खातेदार–ठेवीदार यांच्या सेव्हिंग तसेच ठेवीवरील रकमा व्याजासह तात्काळ मिळाव्यात. पतसंस्थेतील गैरव्यवहारांची चौकशी करुन जबाबदारी निश्चित करुन संबंधितावर फसवणुकीसह फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ११४ ठेवीदारांनी यापूर्वी केली होती. त्यानंतर पतसंस्थेचा कारभार चव्हाट्यावर आला होता. आता तर सेवानिवृत ठेवीदाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सेवानिवृत ठेवीदार नारायण मुळे कुटूंबासह पारनेर शहरात वास्तव्यास आहे. त्यांनी पत्नीसह गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गोरेगाव शाखा पारनेर येथे सेव्हींग खाते उघडले होते. त्यानंतर त्यांनी एकुण ११ लाख २० हजार रुपयांची मुदत ठेव पत्नी व सुनेच्या नावे ठेवली होती. दरम्यान, गोरेश्वर पतसंस्थेचे तत्कालिन संचालक अंबादास शिवराम नरसाळे यांनी ठेवीदार मुळे यांचा विश्वास संपादन करत सात महिन्यानंतरच्या तारखेचे चेक देत मुलगा (सुलभ अंबादास नरसाळे) यांच्या कर्जाची रक्कम भरण्याची मागणी केली.
विश्वासापोटी ठेवीदार मुळे यांनी सुलभ अंबादास नरसाळे याचे गोरेश्वर पतसंस्थतील पारनेर शाखेतील कर्ज खाते क्रमांक १३५९५ यावर दिनांक १३ मार्च २०२४ रोजी ९ लाख ६२ हजार ७९२ रुपये तसेच गोरेश्वर पतसंस्थेचे संचालक अंबादास शिवराम नरसाळे यांचे सेव्हींग खाते क्रमांक २०००१२ यावर १ लाख ५७ हजार २०८ रुपये गोरेश्वर पतसंस्थेतील सेव्हींग खाते क्र. ८०००९९१ मधुन एकुण ११ लाख २० हजार रुपये जमा केले.
त्यानंतर संचालक अंबादास शिवराम नरसाळे यांनी दिनांक १३ मार्च २०२४ रोजी त्यांनी एचडीएफसी बँकेचे तीन चेक दिले. सदरचे चेक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखा, पारनेर येथे जमा केले असता सेंट्रल बैंकने एचडीएफसी बँकेचे चेक दिलेले खाते क्रमांक ५०१००४३२६१७०५४ बंद असल्याचे सांगितले. तदनंतर सेवानिवृत ठेवीदार नारायण मुळे यांच्या आपली फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनात आला.
त्यांनी संचालक अंबादास शिवराम नरसाळे यांचेकडे वेळोवेळी पैशाची मागणी करून देखील पैसे दिले नाही. तसेच पैसे मागण्यासाठी त्याच्याकडे गेले असता अंबादास शिवराम नरसाळे व त्याचा मुलगा सुलभ अंबादास नरसाळे यांनी ‘आम्ही तुमचे घेतलेले पैसे देणार नाही परत पैसे मागायला येवु नका’, पैसे मागायला आला तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात संचालक अंबादास शिवराम नरसाळे, सुलभ अंबादास नरसाळे या पितापुत्रांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहे.