अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
तोफखाना पोलीसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांमध्ये 8 लाख 76 हजार रुपये किमतीचे 92 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने जप्त करत दोन आरोपींना अटक केली. आरोपी प्रकाश उर्फ मारी रावसाहेब उमाप (वय 24, रा. सिद्धार्थनगर) आणि दुर्गेश चंद्रकांत चितांमणो (वय 21, रा. नेप्ती नाका) यांना ताब्यात घेण्यात आले.
फिर्यादी सुनंदा नरहरी ढाकणे (वय 45, रा. पोलीस मुख्यालय) यांनी 18 जुलै 2025 रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 17 जुलै रोजी त्यांच्या घरातून 6 लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली. दाखल गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तपास सुरू केला.
गुप्त माहितीच्या आधारे प्रकाश उमाप याला अटक करून विचारपूस केली असता, त्याने चोरीचे दागिने दुर्गेश चितांमणो याच्याकडे दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी दुर्गेशला ताब्यात घेत 70 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या, 6 ग्रॅमचे टॉप्स, 4 ग्रॅमच्या चार अंगठ्या, साडे चार ग्रॅमचे झुबे, साडे तीन ग्रॅमचे मिनी गंठण, साडे तीन ग्रॅमचे डोरले आणि एक चांदीची चैन असा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत दोन गुन्हे उघडकीस आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकात योगेश चव्हाण, अविनाश बडे, सतीश त्रिभुवन, सतीश भवर, भागवत बांगर आणि राहुल गंन्डु यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार कविता गडाख करत आहेत.