अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
अहिल्यानगर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरातील विळदघाट येथे अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला तब्बल 39 किलो गांजा जप्त करत तिघांना अटक केली आहे. गांजा व कार असा एकुण 13 लाख 75 हजार 260 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (13 ऑक्टोबर) करण्यात आली.
उपअधीक्षक वमने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या अधिपत्याखालील पथकाने विळदघाट परिसरात सापळा रचला. दरम्यान, संशयास्पद कार पकडून तिची तपासणी केली असता त्यातून अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गांजा आढळला. पोलिसांनी वाहनासह तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सदर कारवाईत पोलिसांनी 39 किलो गांजा आणि वापरलेले कार जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश विजय शिंदे (वय 40, रा. निमगाव गांगर्डा, ता. कर्जत), अशोक माणिकराव तरटे (वय 68, रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड) व परसराम आनंदा परकाळे (वय 65, रा. पिंप्री घुमरी, ता. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. सदर इसमांविरूध्द गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिक्षक विकास जाधव हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक वमने, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक जाधव, अंमलदार गणेश धुमाळ, देवीदास खेडकर, जाधव, सचिन वीर, निखील मुरूमकर, किशोर जाधव, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली.