अहिल्यानगर | नगर सह्याद्री
बुरूडगाव रोड येथील चंगेडीया यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेली इको गाडी जप्त करण्यात आली आहे. सागरसिंग बलबीरसिंग जुन्नी (वय 25), गोपाल राजू नायडू (वय 34), सोनू शरद शिंदे ( वय 29), सोनूसिंग रणजितसिंग जुन्नी (वय 21), सतनामसिंग जीतसिंग जुन्नी (वय 23) सर्व रा. अहिल्यानगर अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील आरोपींचे नाव आहे.
शनिवार दि 2 मार्च रोजी चंगेडीया यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी योगेश श्रीकांत चंगेडीया (रा.साईनगर, बुरूडगाव रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली होती. दरम्यान, पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा वरील आरोपींनी केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यात वापरलेली इको कार शहरातील जाधव पेट्रोलपंप येथून चोरी केली असल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मागदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पथकातील पोसई/ तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, रविंद्र घुंगासे, अमृत आढाव, मयूर गायकवाड, जालींदर माने, विशाल तनपुरे, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने बजावली आहे.