अकोले | नगर सह्याद्री –
अकोले पंचायत समितीच्या मवेशी, ब्राम्हणवाडा, शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे 4 कोटी 14 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात 4 लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, समितीच्या परीक्षणात 3 कोटी 64 लाख 5 हजार 400 रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक भीमाशंकर शशिकांत देशमुख, मंदार श्रावणा पावडे, परिचर यूवराज मारुती डगळे, आरोग्य सहाय्यक बाळासाहेब रामराव लोंढे यांनी 2 कोटी 25 लाख 91 हजार रुपये अपहार रक्कम न भरल्याने राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचायत समितीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 4 कोटी 14 लाखांचा शासकीय पैशांचा अपहार प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर मवेशी, ब्राम्हणवाडा, शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 2017 पासून 2024 पर्यंत कार्यरत असलेल्या 56 आरोग्य कर्मचार्यांना नोटीसा बजावत अपहार केलेल्या रक्कम जिल्हा परिषदेकडे भरण्यास सांगितले होते. तर शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहायक मंदार पावडे, मवेशी केंद्रातील कनिष्ठ सहायक भीमाशंकर देशमुख यांनी शासकीय रकमेत अपहार केल्याचे निदर्शनास आल्यावर या दोघांचे जिल्हा परिषद सेवेतून निलंबन करण्यात आले. तसेच घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी संतोष वामन घुले यांच्यावर निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले.
समितीच्या परीक्षण अहवालानुसार सुधारित अपहारित 3 कोटी 64 लाख 5 हजार 400 रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. सदर अपहारित रकमेपैकी 1 कोटी 30 लाख 95 हजार 200 रुपयांचा भरणा संबंधित कर्मचारी यांचेकडून करण्यात आलेला आहे. तसेच अपहारित 2 कोटी 33 लाख 10 हजार 119 रुपयांचा भरणा अद्यापपर्यंत करण्यात आलेला नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी अपहार प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्यामकांत विठ्ठल शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बनावट दस्त करून खरे असल्याचे भासवून त्याचा वापर करून शासकीय कर्मचार्यांनी शासकीय पदाचा गैरवापर करून शासकीय निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
लेखी परीक्षणातून उघड झाला घोटाळा
4 कोटी 14 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणामुळे मवेशी, ब्राह्मणवाडा, शेंडी आरोग्य केंद्राचे विशेष लेखा परीक्षण स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक रमेश कासार हे पथकप्रमुख असून दि. रा. केदार, प्र. ग. भावले, सा. गो. जगताप, हे. ब. मोदी, म. रा. भोसले, ज्ञा. रा. पवार, स्व. कि. भावसार, बा. भ. वाघमारे, र. शं. नामदे, गौ. व. झाल्टे दहा सदस्यीय पथकाने अकोले पंचायत समिती मुख्यालयाचा सन 2019-20 ते 2023-24 या कालावधीचा विशेष लेखा परीक्षण अहवाल दिला होता. त्यातून 3 कोटी 64 लाख 5 हजार 400 रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले.



