नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन
लातूर / नगर सह्याद्री :
मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूरमध्ये देखील पुरपरिस्थितीमुळे मोठं संकट ओढवले आहे. स्थानिकांच्या डोळ्यंतील अश्रू थांबता थांबत नाहीत. एकीकडे पावसामुळे ओढवलेल्या संकटानंतर आता लातूरमध्ये आणखी एक निर्माण झाले आहे. लातूरच्या बडूर, उस्तुरी गावात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. २.४ रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली आहे.
बुधवारी (दि.24) साधारणपणे रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान निलंगा तालुक्यातील हासोरी, बडूर, उस्तुरी या गावात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने यास दुजोरा दिला असून, 2.4 रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाची नोंद झाली असल्याची माहिती आहे.
घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन
तर लातूर जिल्ह्यातल्या मुरुड अकोला परिसरात मंगळवारी रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. अचानक जमीन हादरू लागल्यामुळे लोकांची पळापळ झाली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, भूकंपाचा हा धक्का सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन लातूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीत प्रलयंकारी भूकंप झाला होता. तेव्हापासून लातूर ,औसा, निलंगा तालुक्याला भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. यामुळे स्थानिकांच्या मनात आजही भीती आहे.