अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
आनंदधाम, मार्केटयार्ड परिसरात रविवारी (27 जुलै) रात्री 11 वाजता कोतवाली पोलीसांनी सापळा रचून 3 लाख 99 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा आणि स्विफ्ट कार जप्त केली. याप्रकरणी शरद अर्जुन पवार (वय 30, रा. जाम, कौडगाव, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. पोलिसांनी स्विफ्ट कार (एमएच 16 एबी 3297) थांबवून तपासणी केली असता, शरद पवारच्या ताब्यातून 18 बॅग विमल गुटखा (81,000 रुपये), 18 बॅग व्ही 1 तंबाखू (8,712 रुपये), एक सॅमसंग मोबाइल (10,000 रुपये) आणि कार (3 लाख रुपये) जप्त केली.
पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. शरदने हा माल विक्रीसाठी नेत असल्याचे कबूल केले. फिर्यादी सोमनाथ केकान (पोकॉ/101) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.