अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे. तसेच झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर छापा टाकून १२ लाख ३६ हजाराचे सुमारे चार टन गोमांस जप्त केले. या प्रकरणी सात आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात 2 वेगवेगेळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
हाफीज जलील कुरेशी, गुफरान हाफीज कुरेशी, अल्ताफ खलील कुरेशी, रफीकउल इस्लाम जमालुद्दीन इस्लाम, हानसेन हारून कुरेशी, अरबाज गुलामरसुल कुरेशी, शादाब गुलामरसुल कुरेशी ( सर्व रा.झेंडीगेट, अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई सोमवार (दि.०९) रोजी करण्यात आली आहे.
झेंडीगेट परिसरात जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आली आहेत व काही जनावरांची कत्तल करुन मांसविक्री करण्यात येत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सपोनि/हेमंत थोरात, पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार विश्वास बेरड, गणेश लोंढे, अतुल लोटके, पंकज व्यवहारे, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव व महादेव भांड अशांचे दोन पथक तयार केले.
पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवलेली गोवंशीय जनावरे हाफीज जलील कुरेशी, गुफरान हाफीज कुरेशी, अल्ताफ खलील कुरेशी यांची असल्याची खात्री झाली. पोलिसांनी या जनावरांची सुटका केली. पथकाने या जनावरांची सुटका करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच आंबेडकर चौक, झेंडीगेट परिसरातील अरबाज गुलामरसुल कुरेशी त्याचे साथीदारासह बंदीस्त जागेत कत्तलखाना चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कत्तलखान्यावर छापा टाकला असता रफीकउल इस्लाम जमालुद्दीन इस्लाम, हानसेन हारून कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले.
यावेळी पथकाने १२ लाख ३६ हजाराचे सुमारे चार टन गोमांस जप्त केला. त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी अरबाज गुलामरसुल कुरेशी, शादाब गुलामरसुल कुरेशी याचे सांगणेवरून जनावरांची कत्तल केली असल्याची कबुली दिली, याप्रकरणी सात आरोपीविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.