अहिल्यानगर ।नगर सहयाद्री: –
दोनशे किलो गांजाची वाहतुक करणारे तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपीकडून तब्ब्ल 63 लाख 22 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संतोष वसंत पठाडे ( वय 35, रा.सम्राटनगर, वडगावगुप्ता, एमआयडीसी, अहिल्यानगर ), अक्षय सुर्यकांत भांड ( रा.कोल्हार,ता.राहुरी, जि.अहिल्यानगर ) सतीष अंकुश काळे ( वय 32, रा.सालसे, ता.करमाळा, जि.सोलापूर ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे आहे.
अधिक माहिती अशी: पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेत असतांना आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तीन इसम त्यांचे कडील टाटा कंपनीचा पांढरे रंगाचा टेम्पो मधुन अंमली पदार्थ गांजा भरून खर्डा, ता.जामखेड येथून अहिल्यानगरचे दिशेने विक्रीकरीता येत असलेबाबत माहिती मिळाली.
त्यानंतर आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संतोष लोढे, अतुल लोटके,फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे,प्रशांत राठोड,अरूण मोरे, विजय ठोंबरे, रोहित मिसाळ,मेघराज कोल्हे नेम.तपास पथक अहील्यानावर अशांचे पथक तयार केले.तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले. नमूद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार याच्या पथकाने जामखेड ते अहिल्यानगर रोडवरील एमआयआरसी,हत्ती बारव येथे सापळा लावला.
दरम्यान पांढरे रंगाचा टेम्पो अहिल्यानगरच्या दिशेने येताना दिसला. पथकाने टेम्पो रस्त्याचे कडेला थांबवून, टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये 3 इसम बसलेले दिसले. झडती घेतली असता टेम्पोमध्ये अंमली पदार्थ गांजा आढळून आला. पथकाने त्याच्याकडून टेम्पोसह 63 लाख 22 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.