अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटच्या आर्थिक घोटाळा प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी पंढरपूर येथून जेरबंद केले आहे. भारत बबन पुंड (रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ठेवीदार रोहिदास सदाशिव जाधव (वय 74, रा. जेऊर बायजाबाई) यांनी फिर्याद दिली होती.
त्यानुसार भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, मॅनेजर, कर्मचारी अशा 18 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठेवीदारांचा विश्वास संपादन करून मल्टीस्टेट सोसायटी मध्ये चालू व बचत खाते उघडुन रोख रक्कमा जमा केली. जास्त व्याजदर देतो, रक्कमा दामदुप्पट देतो असे अमीष दाखवून ठेवीदारांच्या रक्कमाच्या ठेवी ठेऊन घेतल्या. त्यानंतर ठेवीदार यांनी त्यांच्या पैशाची मागणी केली असता संशयीत आरोपींनी कोट्यावधी रूपयांची परतफेड न करता विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.
सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि माणिक चौधरी यांना सदर गुन्हयातील मुख्य आरोपी भारत बबन पुंड पंढरपुर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पंढरपुर येथे सापळा रचत आरोपाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक बी. चौधरी, प्रभारी अधिकारी पोसई जाधव, पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोहे कॉ/ सुद्रीक, पो कॉ/ किशोर जाधव, पोकॉ/ सुरज देशमुख, पोकॉ राहुल गुंड यांच्या पथकाने केली आहे.