Rekha Gupta Delhi New CM: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर अखेर नव्या मुख्यमंत्र्यांची निवड झाली असून, भाजपच्या रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. रामलीला मैदानावर पार पडलेल्या या भव्य शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे वरिष्ठ नेते आणि अनेक मंत्री उपस्थित होते.
शपथविधी समारंभ दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आला. यावेळी रेखा गुप्ता भगव्या रंगाच्या साडीत दिसल्या. संपूर्ण मैदानात भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळाला. भाजपच्या विविध राज्यांतील मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
यावेळी प्रवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनीही शपथ घेतली. रेखा गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांच्या आधी आतिशी, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज यांनी हे पद भूषवले होते. रेखा गुप्ता या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी तीन वेळा आम आदमी पार्टीच्या आमदार राहिलेल्या बंदना कुमारी यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहे.