Politics News: लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे नैराश्यात असलेल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप १५० ते १६० विधानसभा मतदारसंघात चांगल्या स्थितीत असल्याचे महायुतीतील मित्रपक्षांना सांगितले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शहा यांनी २८८ पैकी कोणत्याही मतदारसंघात भाजप शिंदे गट किंवा अजित पवार गटाच्या उमेदवारांबद्दल कोणताही भेदभाव करणार नाही, असे आश्वासनही दिले. या दोन्ही पक्षांना त्यांचे आमदार असलेल्या मतदारसंघांत जागा देण्यात येईल. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांचे सूत्र लक्षात घेत महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या पक्षासाठी कोणताही आग्रह धरलेला नाही.
अन्य मतदारसंघात ज्याची ताकद, त्यालाच संधी असे सूत्र स्वीकारण्यास तिघांनीही संमती दिली असल्याचेही समजते. सत्ता येणे महत्त्वाचे आहे, पक्षाचा अभिमान जपणे नव्हे यावरही तिघांचेही एकमत झाले आहे. मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाल्याचे चित्र पसरले असले तरी या समाजातील काही मते आपल्याला मिळतील, असा विश्वास महायुतीला आहे, असे एका नेत्याने सांगितले.
सध्या शिंदे गटाचा जोर ६० ते ६५ विधानसभा मतदारसंघांत दिसतो, अशी चर्चाही झाली. अजित पवार गटही ५० जागांची मागणी करत असला तरी त्यांनी ४० फार तर ४५ मतदारसंघ मागावेत, असे मत व्यक्त केले आहे, असे सांगण्यात आले आहे. अजित पवार गटाने केलेल्या पाहणीत २२ मतदारसंघ ते जिंकतील पण १४ मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी मित्रपक्षांची लागणार आहे.