खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब | महायुतीचा घोडेबाजार फसला
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावले. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली असून, खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. 10 नोव्हेंबर) विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. हात वर करून मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत डॉ. कावरे यांनी विजय मिळवला.
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, निता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ. कावरे यांनी मतदान करून डॉ. कावरे यांचा विजय निश्चित केला.विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशीव औटी, युवराज पठारे, निता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी’ मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आले.
लाखो रुपयांच्या ऑफर्स देत मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. तरीसुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी 9 नगरसेवकांना व्हिप बजावत डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे असे निर्देश दिले होते. या व्हिपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुटीचा नमुना दाखवला.नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
निष्ठेचा विजय; आगामी निवडणुकांच्या विजयाची नांदी
खासदार नीलेश लंके यांनी नगरसेवकांच्या निष्ठेचे कौतुक करत म्हटले की, राजकारणात निष्ठा सर्वांत मोठी असते. लाखो रुपयांचे आमिष असतानाही आघाडीचे नगरसेवक डगमगले नाहीत, हीच खरी आमची ताकद आहे. डॉ. विद्या कावरे यांच्या विजयाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयाची नांदी झाली आहे.



