संगमनेर । नगर सहयाद्री:-
केवळ महायुतीतच नाही तर आघाडीचे सरकार असतानाही अर्थ खात्याने मनमानी कारभार केला, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नोंदवले. महायुतीतील घटकपक्ष शिवसेनेनंतर विरोधी पक्षातूनही अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील या पाच वर्षांतल्या राजकारणाची सर्वात दुर्दैवी राजकारण म्हणून इतिहासात नोंद होईल, अशी खंतही थोरात यांनी व्यक्त केली.
अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे. दहा वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती. मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही, असे वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी जळगाव येथे केले. याच विषयावर माध्यमांशी बोलताना थोरात यांनी संगमनेर येथे भाष्य केले. राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते म्हणाले की, आपण स्वतः आठ पंचवार्षिकपाहिलेल्या आहेत. दुर्दैवाने सध्याची पंचवार्षिक राज्यासाठी सर्वात वाईट ठरली. राज्याच्या हिताचा विचार न करता सत्तेच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले.
राजकारणाचा घसरलेला हा स्तर मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या राज्यासाठी भूषणावह नाही. अर्थ खात्याचे काम पाचही वर्षांत कधीही न्यायाचे झाले नाही. वास्तविक तुमच्याकडे अर्थ खाते म्हणजे सगळे तुमचेच असे समजण्याचे कारण नसते. सर्व राज्याला समान न्याय या तत्त्वाने कारभार न करता फक्त आपल्या मर्जीतल्या लोकांना वारेमाप निधी दिला गेला. त्यांच्याच विभागात विकास कामे करण्याचा धडाका लावला. मात्र या विकास कामांतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने हा पैसा गेला कुठे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. निधी वाटपाबाबत पाचही वर्षे भेदभाव केला गेला. आघाडी सरकार असताना वेळोवेळी आपण त्याची तक्रार योग्य ठिकाणी केली होती. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या खात्यात इतके अयोग्य निर्णय घेतले गेले, असा गंभीर आरोपही थोरात यांनी केला.
महायुतीचा अजेंडा स्वार्थासाठी!
महायुतीतील मतभेदावर बोट ठेवताना थोरात म्हणाले की, एक मुख्यमंत्री आहेत. त्यांना पद टिकवायचे आहे. एक मुख्यमंत्री राहिले होते, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे. एकाची काहीही करून मुख्यमंत्री होण्याची धडपड चालू आहे. या तिघांचाही आपला स्वतः चा वेगवेगळा अजेंडा आहे. हा अजेंडा जनतेच्या हितासाठी नसून त्यांच्या स्वार्थासाठी आहे. त्यामुळे महायुती एकसंध राहिली नसून त्यांच्यात ठिकठिकाणी मोठे मतभेद झालेले आपल्यास दिसतात. मोठ्या प्रमाणावर योजना राबवून निधी खर्च केलेला दाखवला जातो, मात्र कोणतेही काम दर्जेदार होत नाही. राज्य बरबाद करण्याचे काम महायुतीने केल्याची टीका आमदार थोरात यांनी केली.