महाविकास आघाडीचं पानिपत | हेमंत ओगलेंनी वाचवली इज्जत | शरद पवारांसह ठाकरेसेनेला झिडकारले
विजयी: भाजप राधाकृष्ण विखे पाटील, विक्रमसिंह पाचपुते, शिवाजीराव कर्डिले, विठ्ठलराव लंघे, मोनिकाताई राजळे, अजित पवार गट: संग्राम जगताप, काशिनाथ दाते, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, शिंदेसेना: अमोल खताळ, काँग्रेस: हेमंत ओगले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना नगर जिल्ह्यात देखील महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधून अमोल खताळ या नवख्या तरुणाकडून झालेला धक्कादायक पराभव हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानले पाहिजे. विखे पाटलांनी लोकसभा निवडणुकीतील उट्टे काढल्याचाच हा निकाल मानला जातो.
शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवला. याशिवाय नगर शहरातून देखील अजित पवार गटाच्या संग्राम जगताप यांनी हॅटट्रीक साधताना मोठे मताधिक्य मिळवले. राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांनी मोठे मताधिक्य घेत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. भाजपाचे उमेदवार विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदा), मोनिकाताई राजळे (शेवगाव-पाथड) आणि राम शिंदे (कर्जत- जामखेड) यांनी त्यांचे गड राखले. हेमंत ओगले (काँग्रेस) यांनी जागा राखल्याने महाविकास आघाडीची इज्जत वाचली! ओगले यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील बारापैकी 11 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.
खा. निलेश लंके यांचा करिष्मा अवघ्या चार महिन्यांत संपला!
लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर खा. निलेश लंके यांनी नगरमधून बाराही आमदार निवडून आणतो आणि मुंबईला घेऊन येतो असे जाहीर वक्तव्य केले होते. आज झालेल्या मतमोजणीत प्रत्यक्षात त्यांच्याच शरद पवार गटाला नगर लोकसभा मतदारसंघात विधानसभेची जागा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. याशिवाय त्यांच्या पत्नीला पारनेरमधून निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडावे लागले.नगर तालुक्यातील गावांनी देखील दाते यांना मताधिक्य दिले. नगर लोकसभा मतदारसंघातील जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असताना शिड लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूरचा अपवाद वगळता अन्यत्र अन्य पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले.
‘बटेंगे ते कटेंगे’चा हिंदुत्वाचा नारा अन् लाडकी बहीण योजना!
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांसह दलित- ख्रिश्चन मतदारांनी महायुतीकडे पाठ फिरवली. विशेषत: मुस्लिम मतदारांनी त्यांची मते एकगठ्ठा महाविकास आघाडीला दिली. त्यातून हिरव्या गुलालाची चर्चा झडली. हिंदू मतदारांनी संघटीतपणे मतदान केले नाही तर मुस्लिम मतदारांचा गठ्ठा मतांचा धोका आणि लोकसभेतील निकालानंतर त्यांची बदलली भाषा, देहबोली हे सारेच मुद्दे हिंदू मतदारांना खटकत होते. महायुतीकडून ‘कटेंगे तो बटेंगे’चा नारा दिला गेला आणि त्यास जनतेने प्रतिसाद दिल्याचे मतदानातून समोर आले. याशिवाय लाडकी बहिण योजनेचा मोठा फायदा झाला.
सुजय विखेंना पाडण्यासाठीची लुडबूड भोवली: बाळासाहेब थोरात यांना मोजावी लागली राजकीय किंमत
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शरद पवार गटाने निलेश लंके यांना सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिड मतदारसंघापेक्षाही जास्त लक्ष नगरमध्ये घातले. लंके यांच्यासाठी संगमनेरची यंत्रणा दिली आणि जोडीने आर्थिक रसद पुरवली. त्यात लंके यांचा विजय झाला. यानंतर थोरात यांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले आणि विखे पाटलांचे पॅनल पराभूत केले. यातून विखे पाटील दुखावले. गणेशच्या निकालानंतर विखे पाटलांनी संगमनेरमध्ये फक्त लक्षच घातले नाही तर गावेच्यागावे पिंजून काढली. सुजय विखे हेच उमेदवार असणार हे नक्की असताना धांदरफळची घटना घडली आणि विखे पाटलांना रिव्हर्स गेअर टाकावा लागला. मात्र, तोपर्यंत गावागावामध्ये थोरात यांच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. अमोल खताळ यांना शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी देऊन त्याला विजयी करण्यासाठी विखे पाटलांनी रान पेटवले. गावागावांमध्ये जाऊन सुजय विखे यांनी मुक्काम ठोकला. हवी ती रसद पुरवताना अमोल उमेदवार नसून मीच उमेदवार असल्याचे सांगत सुजय विखे यांनी शेवटच्या दहा दिवसात संगमनेर पिंजून काढले. थोरात यांची मुुस्लिम धार्जिणी भूमिका देखील मांडली गेली. आपल्याला कोणीच पराभूत करणार नाही असा फाजिल आत्मविश्वास थोरातांनी ठेवला. त्यातच त्यांची गफलत झाली. विखेंना पाडण्यासाठी शिड मतदारसंघात शरद पवार, प्रियंका गांधी यांच्या सभा त्यांनी लावल्या. मात्र, या सभांच्या नियोजनात थोरात असतानाच तिकडे त्यांच्या मतदारसंघात विखे पाटलांनी यंत्रणा अधिक गतीमान केली. निलेश लंके यांना रसद पुरवणे आणि विखेंना थेट विरोध करण्याची राजकीय किंमत थोरात यांना स्वत:च्या पराभवाने मोजावी लागली.
सुजय विखे पाटलांनी संगमनेर-पारनेरमध्ये दाखवून दिले ‘टायगर अभी जिंदा है’!
राज्याच्या राजकारणात भावी मुख्यमंत्री म्हणून इमेज तयार झालेल्या बाळासाहेब थोरात यांचा नवख्या तरुणाकडून पराभव करण्यात अत्यंत निर्णायक भूमिका बजावण्याचे काम माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी बजावली. थोरात यांच्याच हस्तक्षेपामुळे नगरमध्ये पराभव झाल्याची भावना सुजय यांच्यात तयार झाली होती आणि त्यातूनच ते थोरात यांचा पराभव करायचाच या इर्षेने पेटून उठले होते. चार महिन्यात त्यांनी संगमनेर गाठले नाही असा दिवसच नव्हता. दुसरीकडे ज्या निलेश लंके यांच्यामुळे आपला पराभव झाला, त्या निलेश लंके यांना पारनेरमध्ये घेरण्याचे काम त्यांनी केले. ‘आता नाही तर कधीच नाही’, ही भावना त्यांनी जागृत केली. त्यातूनच तालुुक्यातील लंके यांच्या विरोधकांची मोट बांधण्याचे काम त्यांनी केले. पारनेर आणि संगमनेरमध्ये भाजपाचा उमेदवार नव्हता. महायुतीचे उमेदवार होते. मात्र, अमोल खताळ आणि काशिनाथ दाते या दोघांच्या खांद्याचा वापर अत्यंत चाणक्षपणे सुजय विखे पाटलांनी केला. लंके यांच्या खासदारकीसाठी मदत करणाऱ्या थोरातांना पराभूत करतानाच ज्यांना खासदारकी मिळाली त्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पराभूत करण्यासाठी सुजय विखे यांनी अतोनात कष्ट घेतले. संगमनेरमधील त्यांचे प्रयत्न पडद्यासमोर आले आणि पारनेरमधील त्यांचे प्रयत्न पडद्याआड जास्त राहिले इतकेच! मात्र, असे असतानाही त्यांनी दोन्हीकडे रिझल्ट ओरीऐटेंड काम करत ‘टायगर अभी जिंदा है’, हे कृतीतून दाखवून दिले. त्यातून थोरात यांच्या राज्यातील प्रतिमेला जसा तडा गेलाच तसाच तडा गेला तो लंके यांना देखील!
किंगमेकर! राधाकृष्ण विखे पाटील ठरले जिल्ह्याचे
संगमनेर आणि पारनेरमध्ये आपण म्हणू तेच होणार हे सुजय विखे पाटलांनी दाखवून दिले असताना पडद्याआड पालकमंत्री विखे पाटलांनी त्यांना मुक्तस्वातंत्र्य दिले. या दोन मतदारसंघात निकाल अपेक्षीत असा घेताना पालकमंत्री विखे पाटलांनी नेवासा, कोपरगाव, अकोले, राहुरी, नगर शहर, श्रीगोंदा या मतदारसंघात व्यक्तीगत लक्ष घातले. कोणत्या उमेदवाराला काय कमी पडतेय आणि त्याला कशाची मदत लागतेय हे सारे त्यांनी अत्यंत हुशारीने फक्त हेरलेच नाही तर त्याला पाहिजे ती रसद पुरविण्याचे काम केले. त्यातून नेवासा मतदारसंघात शिंदे सेनेचे विठ्ठलराव लंघे यांना निवडून आणण्यात विखे पाटलांनी अत्यंत मेहनत घेतली. शरद पवार यांचा बालेकिल्ला अशी नगरची होऊ लागलेली ओळख पुसण्याचे काम पालकमंत्री विखे पाटील यांनी केेले आणि राज्यातील काँग्रेसचा चेहरा समजले जाणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना अस्मान दाखवले. निकाल पाहता जिल्ह्याचा किंगमेकर मीच असल्याचे विखे पाटलांनी दाखवून दिले.
विक्रम पाचपुते यांनी संयमाने खेचून आणला विजय!
कोणतीही मोठी जाहीर सभा न घेता नागवडे आणि जगताप यांच्यातील आरोप- प्रत्यारोपात न पडता विक्रमसिंह पाचपुते यांनी एकहाती विजय खेचून आणला. लोकसभा निवडणुकीपासून गावागावात जाऊन कार्यकर्त्यांचा संच तयार करणे आणि त्यांना हवी ती रसद पुरवणाऱ्या विक्रमसिंह पाचपुते यांना मतदारसंघातील उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा फायदा झाला. विशेषत: अण्णासाहेब शेलार यांना मिळालेली मते पाचपुते यांच्यासाठी फायद्याची ठरली. अनुराधा नागवडे यांनी पंधरा दिवसात उमेदवारी मिळवून देखील त्यांना त्याचा फायदा झाला नाही.
शिवाजीराव कर्डिलेंचे जोरदार कमबॅक; प्राजक्त तनपुरेंना धोबीपछाड
राहुरी मतदारसंघात दोन माजी राज्यमंत्री एकमेकांच्या विरोधात होते. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीतील दहशतीचा मुद्दा समोर आणला आणि त्यावर चर्चा झडत असतानाच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची दमबाजी करणारी ऑडीओ क्लीप बाहेर आली आणि निवडणुकीतील दहशतीचा मुद्दा संपला. कर्डिले यांनी नेटके नियोजन करताना तनपुरे यांना पुरते घेरले. राहुरी तालुक्यातून कर्डिले यांनी मोठे मताधिक्य घेतले आणि तेच कायम राहिले. कर्डिले यांना विखे पाटील समर्थकांनी मोठी साथ दिली आणि जोडीने हिंदू मतदारांनी संघटीत भूमिका घेतली. कर्डिले यांनी शेवटच्या टप्प्यात संयमी भूमिका घेतली आणि तीच त्यांच्यासाठी निर्णायक झाली.
पारनेरमध्ये लंके यांना भोवला फाजिल आत्मविश्वास अन् पत्नीची उमेदवारी!
प्र्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या लंके यांनी गत विधानसभा आणि काल परवाची लोकसभाही त्याच मुद्यावर जिंकली. मात्र, यावेळी विधानसभेसाठी स्वत:च्या पत्नीला उमेदवारी घेणाऱ्या लंके यांच्यावरच मतदारांनी घराणेशाहीचा आरोप केला अणि तशी चर्चाही घराघरात झाली. माजी आमदार विजय औटी यांना लंके यांनीच उभे केल्याची चर्चा झडली! यानंतर औटी यांच्या बाजूने गेलेल्या मतदारांनी काशिनाथ दाते यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. विजू औटी या युवकाने माघार घेत दाते यांना पाठींबा दिला. यानंतर निवडणुक दाते यांच्या बाजूने झुकली. नगर तालुक्यातील गावांमधून काशिनाथ दाते यांनी निर्णायक आघाडी घेतली. विशेषत: माधवराव लामखडे यांच्या निंबळकसह त्या गटातील गावांमधून दातेंना आघाडी मिळाली. मी म्हणेल तेच आणि मला कोणीच पाडू शकत नाही, ही त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेली भावनाच त्यांच्या विजयात अडसर ठरली. याशिवाय पत्नीची उमेदवारी देऊन प्रस्थापित होऊ पाहणाऱ्या लंके यांना पारनेरकरांनी रोखले इतकेच!
मोनिका राजळेंची हॅट्ट्रिक अन् विठ्ठल लंघेची लॉटरी
शेवगाव-पाथड मदतार संघातून भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी विजयाची हॅटट्रीक केली. अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी पहिल्या टप्प्यात निर्णायक आघाडी घेवूनही पाथड तालुक्यातील गावांमध्ये त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. येथून राजळे यांना निर्णायक मताधिक्य भेटले. प्रताप ढाकणे यांची फक्त सोशल मिडियात हवा दिसली. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. नेवासा मतदार संघातून शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेले परंतू पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रसद पुरविलेले विठ्ठलराव लंघे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांना धोबीपछाड दिले.