Aaditya Thackeray: महायुती सरकारच्या काळात पहिल्या १०० दिवसात काय झाले ते बघा, एक तरी योजना आली का? या सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? तरुण-तरुणींसाठी एकतरी चांगली योजना आणली आहे का? लाडकी बहीण योजना आता ५०० रुपयांवर आणली आहे. यावरून हे सरकार तुमचं आहे असं वाटतं का? गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची असून, रावणापेक्षा भयंकर सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे. अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारवार टीकास्त्र सोडले.
शिवसेना ठाकरे गटाचे एक दिवसीय विभागीय निर्धार शिबिर नाशिकमधील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन लॉन्स येथे पार पडत आहे. या शिबिरास संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शिबिराचे उद्घाटन पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ईशान्य मुंबईनंतर नाशिकमध्ये आपले शिबीर होत आहे. आपण खरंतर मैदानातील माणसे आहोत. परंतू, दिशा ठरविण्यासाठी आपली वाटचाल ठरविण्यासाठी जिल्ह्यात, विभागात असे शिबीर झाले पाहिजे. मी कोणत्या विषयावर बोलायचे यासाठी राऊतसाहेबांना फोन केला. त्यावेळी मी म्हणालो, संजयकाका उद्या कोणत्या विषयावर बोलायचं? ते लगेच बोलले, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर बोला.
मला लहानपणापासून राजकारणाची आवड होती. ७ ते १० वर्षाचा असल्यापासून हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीत, विमानात बसून दौऱ्यावर निघून जायचो. एकदा दहावीच्या परीक्षेच्या चार दिवस आधी वडिलांसोबत श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो” अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.
निवडणूक नसताना कर्जमाफी देणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महिलांवर अत्याचार होत असल्याच्या विरोधात सर्वात कडक शक्ती कायदा आणणारे एकमेव मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. नाशिकमधे स्मार्ट सिटी योजना पूर्ण झाली आहे का? सगळीकडे लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना सुरू आहे. जात धर्म, तालुका जिल्हा आशा वादात व्यस्त ठेवले जात आहे. इंग्रजांच्या नीतीप्रमाणे तोडा, फोडा आणि राज्य करा, असा राज्य कारभार केला जात असल्याचे ते म्हणाले.