फडणवीसांची जादू; ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यशस्वी अन् आरक्षणाच्या फुग्याला टाचणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावांची जपमाळ ओळत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात जातिजातींत लावून दिलेली भांडणे, संजय राऊतांचे रोज सकाळी नऊ वाजता गरळ ओकणे, नाना पटोले, विजय वडेट्टवार यांच्यासारख्या बोलभांड नेत्यांची वक्तव्ये, उद्धव ठाकरे यांनी वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन फक्त आणि फक्त भाजप नेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासाठी खालच्या पातळवीर केलेली भाषा आणि हे सारे हालाहल पचवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी शांत, संयम ठेवून खेळलेले डावपेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधलेली वज्रमूठ आणि यावर कळस चढविणाऱ्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची सफलता या सर्वांचा परिणाम म्हणजे 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले घवघवीत यश होय. 200च्या वर जागा जिंकून महायुतीने महाराष्ट्राची सत्ता काबीज केली.
महाराष्ट्राच्या सर्व विभागांचे निकाल पाहिले तर असे कोणतेच विभाग नाहीत की जिथे महायुतीने घवघवीत यश मिळविले नाही. सर्व विभागांत महायुतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चारीमुंड्या चीत केले. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा गड समजला जातो. परंतु त्या गडाच्या अनेक बुरुजांवर महायुतीने आपला झेंडा फडकविला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीतील अनेक नेते शरद पवार यांनी फोडून आपल्या कळपात आणले; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
जनतेला या गोष्टी पटल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे आदी साऱ्या ठिकाणी महायुतीची सरशी झाली. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर आपले खातेही उघडता आले नाही. दस्तुरखुद्द त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेही माहीम मतदारसंघात पराभूत झाले. मनसेमुळे महायुतीला काही जागांचा फटका बसेल असे बोलले जात होते; परंतु मतदारांनी या साऱ्या गोष्टी बाजूला ठेवून महायुतीच्या बाजूने कौल दिला. ज्या मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी ‘मराठा आरक्षण’ लढा सुरू करून महाराष्ट्र तापविला, त्या मराठवाड्यातही महायुतीने आपला झेंडा फडकविला. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात महायुतेीने आघाडी घेेतली.
महायुतीच्या महाराष्ट्रातील मोठ्या विजयाला अनेक झालरी आहेत. हिंदू समाजाला गृहीत धरून शरद पवार, उबाठा आणि काँग्रेसने मुस्लािमांच्या अवास्तव मागण्या पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन हिंदू जनतेला आगामी भीतिदायक वातावरण निर्माण होण्याचे डोळ्यांसमोर दिसू लागले. या संदर्भात विश्व हिंदू परिषदेने सर्व धर्मचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार वारकरी संप्रदाय यांच्या माध्यमातून या मागण्यांच्या विरोधात जागरण करण्यास सांगितले. त्यांनी ते उत्तमपणे पार पडले. असे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडले.
हभप रामगिरी महाराजांना जीवानिशी मारण्याची आलेल्या धमकीकडे वारकरी संप्रदायाने डोळेझाक न करता आज ना उद्या आपल्यालाही असेच सामोरे जावे लागेल असे त्यांना वाटले आणि त्यांनी हिंदुत्वाचा जागर केला. त्याचा परिणामही महायुतीच्या विजयात झाला. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गोष्ट हलक्यावर घेतली नाही. तिच्या खोलात जाऊन खेळी करीत राहिले. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या कमी जागा याला कारणीभूत होते.
असंख्य मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाली होती ते होये. 57 लाख मतदारांची नावे गायब झाली होती. याचा अभ्यास करून फडणवीसांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लावले आणि जवळ जवळ बहुतांश नावे यादीत आणली व ते मतदान घडवून आणले. त्याचाच परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यात झाला. ही वाढलेली टक्केवारीच महायुतील ‘बंपर’ जीत देऊन गेली. लोकसभेला मविआला फुगलेला फुगा विधानसभेला असा टचकन फुटला. सावध राहून, संयम ठेवून आणि शांत डोक्याने खेळी खेळली तर शरद पवारांसारख्या कसलेल्या पहिलवानालाही पराभूत करता येते हे त्यांनी दाखवून दिले.
आणखी एक बाब म्हणजे मराठा आरक्षणाला 1994 ला शरद पवार मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांनी केलेला विरोध सोशल मीडियावरून दाखविण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात त्यांच्या सरकारने काढलेला ‘जीआर’च दाखविल्यानंतर आरक्षणाचे खरे मारेकरी कोण आहेत ते मराठा तरुणांना चांगले समजले. त्यांनी जरांगे पाटलांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबाही दिला, तसेच मविआच्या विरोधात या निवडणुकीत रागही दर्शविला. तसेच ओबीसी फॅक्टरला महायुतीने आपलेसे केले. त्यामुळेही महायुती वरचढ ठरली.