नागपूर / वृत्तसंस्था –
६४ चौकोनांवर गेल्या १४ वर्षांत खेळत दिव्या देशमुखने आपले नाव इतिहासात कोरले आहे. २०१३ मध्ये सर्वात कमी वयाची वुमन फिडे मास्टर (WFM) बनून सुरुवात केलेल्या दिव्याने, आता जॉर्जियातील बातुमी येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम फेरीत विजय प्राप्त करत भारतासाठी नवा मैलाचा दगड ठरवला आहे. फिडे वुमेन्स वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय ठरली होती.
वुमेन्स वर्ल्ड कपमधील दुसऱ्याच प्रयत्नात दिव्याने भारतीय विक्रम नोंदवला आहे. १९ वर्षांची ही विश्व कनिष्ठ विजेती खेळाडू गेल्या ३४ वर्षांत महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारी पहिली किशोरवयीन ठरली आहे. यासोबतच तिने आपला ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आहे आणि आता ती भारताची चौथी वुमन ग्रँडमास्टर झाली आहे. आजवर केवळ तीन भारतीय महिला – कोनेरू हंपी, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांना ग्रँडमास्टर पदवी मिळाली आहे.
दिव्याने २०१० मध्ये केवळ पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. इतर अनेक भारतीय पालकांप्रमाणेच तिचे पालक डॉ. जितेंद्र आणि नम्रता यांनी तिला जवळच्या बुद्धिबळ अकादमीत घातले. नागपूरच्या शंकर नगर येथील त्यांच्या वसाहतीत बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि बुद्धिबळ असे तीन खेळ शिकवले जात होते. दिव्याची मोठी बहीण आर्या बास्केटबॉल आणि बॅडमिंटन खेळत होती, तर दिव्याला तिच्या आई-वडिलांनी बुद्धिबळ निवडून दिला.
हळूहळू तिला या खेळाची आवड निर्माण झाली आणि दोन वर्षांतच, जुलै २०१२ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या स्पर्धेत तिने आपले पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक – अंडर ७ गटात – पटकावले.
त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. २०१३ मध्ये इराणमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने अंडर ८ विजेतेपद मिळवत आपली आंतरराष्ट्रीय छाप सोडली. त्यानंतर ती पुढील वर्षी वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरली. २०१४ मध्ये, वयाच्या अवघ्या आठ वर्षे आणि पाच महिन्यांत, तिने दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे अंडर१० वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत तिने ९ विजय आणि २ बरोबरीसह अजिंक्यपद मिळवले. तेव्हापासून तिने भारताचे ४० वेळा प्रतिनिधित्व केले असून, त्यात तिने ३५ वेळा पदक मिळवले आहे – २३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य.
२०२० मध्ये FIDE द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या ऑलिम्पियाडमध्ये ती भारताच्या विजयी संघाचा भाग होती. त्यानंतर तिने भारतातील सर्वोच्च खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आणि विश्वनाथन आनंद यांच्याकडून मार्गदर्शन मिळवायला सुरुवात केली. एका वर्षाच्या आतच ती वुमन ग्रँडमास्टर बनली आणि २०२३ मध्ये इंटरनॅशनल मास्टर पदवी प्राप्त केली.
वयाच्या १७ व्या वर्षी तिने दोन वेळा राष्ट्रीय महिला विजेतेपद पटकावले. १८ व्या वर्षी तिने कझाकस्तान येथे आपले पहिले वुमेन्स कॉन्टिनेंटल विजेतेपद मिळवत आशियाई बुद्धिबळ राणी ठरली. गेल्या वर्षी जूनमध्ये तिने U-20 वर्ल्ड जूनियर स्पर्धेत ११ पैकी १० गुण मिळवत वर्ल्ड जूनियर चॅम्पियन ही पदवी मिळवली – हे तिचे तिसरे जागतिक विजेतेपद होते. आंतरराष्ट्रीय रेटिंगनुसार, ती भारतातील ज्युनियर नंबर १ ते वर्ल्ड ज्युनियर नंबर १ अशी पोहोचली असून सध्या ती ही क्रमवारी कायम राखून आहे. तिचा दृष्टिकोन नेहमीप्रमाणे “एक स्पर्धा एकवेळी” असा असून, ती परिस्थितीप्रमाणे खेळते.
GM होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी, तिच्या पुढील ध्येयाकडे – म्हणजे कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकून जु वेनजुन (चीन) या सध्याच्या वर्ल्ड वुमेन्स चॅम्पियनला आव्हान देण्याच्या दिशेने ती वाटचाल करत आहे.
जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या FIDE विश्वचषक 2025 मध्ये, दिव्या देशमुखने अखेर विजय मिळवला आणि विश्वचषक विजेतेपद पटकावले. दोन्ही खेळाडूंमधील क्लासिकल सामने अनिर्णित राहिले. शनिवार आणि रविवारी खेळल्या गेलेल्या क्लासिकल सामन्यात, ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने नवीन बुद्धिबळ स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू दिली नाही. क्लासिकल सामना 1-1 गुणांनी बरोबरीत राहिला.
सोमवारी खेळल्या गेलेल्या रॅपिड राउंडमध्ये, 18 व्या जागतिक क्रमवारीत नागपूरची दिव्या देशमुखने पांढऱ्या सोगंट्यासह सुरुवात केली. ती देखील आक्रमक दिसत होती. परंतु 5 व्या जागतिक क्रमवारीत असलेल्या हम्पीने काळ्या सोगंट्यासह खेळून सामना बरोबरीत आणला. रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोगंट्यासह खेळताना, दिव्या देशमुखने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. तर, तज्ञांच्या मते, सुरुवातीला कोनेरूसाठी वेळेचे व्यवस्थापन थोडे कठीण वाटत होते आणि तिने रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्येही चूक केली.