अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकासह चार दिवसांपूर्वी (दि. २९ ऑगस्ट) मुंबईत दाखल झाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या केसाला धक्का जर लागला तर महाराष्ट्र पेटेल अशी गर्जना नगर शहरातील सावेडीकरांनी केली आहे.
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यात राज्यातील विविध भागांतील लाखो समाजबांधव सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळ परिसरातील हॉटेल आणि खाऊ गल्ली बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी आंदोलकांची उपासमार सुरू आहे. माध्यम आणि समाजमाध्यमातून ही माहिती समजल्यावर सावेडी ग्रमास्थांसह तरुणांनी या संकटात कंबर कसली आहे.
२५ हजार पाण्याच्या बॉटल, १ टन फरसाण, १० हजार पॅकेट बिस्किटे, राजगिऱ्याचे लाडू, कोलगेट, साबण, तेलाच्या बाटल्या, ब्रश आणि तीन हजार धपाटे याबरोबरच भाकरी, ठेचा, पिठलं असे पदार्थ टेम्पो, ट्रकमधून मुंबईकडे रवाना करण्यात आल्या असून आंदोलनाच्या इतिहासातील सर्वात मोठी मदत करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामस्थांनी निर्धार व्यक्त करत जेवण तर आम्ही देऊ, पण जर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला तर, पेट घेणारी ठिणगी इथूनच उठेल असा इशारा देखील सावेडीकरांनी दिला आहे. सावेडीतुन मुबईकडे निघालेल्या या ताफ्याने फक्त अन्नधान्यच नव्हे तर संतप्त समाजाची चेतावणी देखील घेऊन पाऊल टाकले आहे.
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचे आवाहन केले. त्यानुसार गावागावांत समाज माध्यमातून मदतीसाठी लोक पुढे येत आहेत. नगर शहर, नेवासे, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदे अशा सर्वच तालुक्यांतून खाद्यपदार्थ मुंबईकडे पाठवले जात आहेत. कोपर्डीतील घटनेमुळे अहिल्यानगरमधूनच मराठा आंदोलनास प्रारंभ झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जिल्ह्याजिल्ह्यात क्रांती मोर्चे काढण्यात आले.
त्यानंतर जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून आरक्षणाची लढाई सुरू केली. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात समाजबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. जे आंदोलनात सहभागी नाहीत ते मदत पोहोचवत आहेत. पुढचा क्षण महाराष्ट्रासाठी किती गडद ठरेल हे सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.