मुंबई / नगर सह्याद्री –
Maharashtra Weather News : मान्सूनचा प्रभाव असणारा कमी दाबाचा पट्टा सध्या राजस्थानपासून पूर्वमध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असून, गुजरातपासून कर्नाटकापर्यंतसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. झारखंड ते ओडिशा भागामध्येही कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास पूरक स्थिती असून, या संपूर्ण रचनेचे कमीजास्त प्रमाणातील परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसत आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातून पावसानं काही प्रमाणात विश्रांतीची वाट धरल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रासह मुंबई शहर आणि उपनगरामध्येही हीच स्थिती असताना कोकण, विदर्भ आणि राज्यातील घाटमाथ्याचा परिसर मात्र इथं अपवाद ठरत आहे. कारण, इथून वरुणराजानं अद्याप माघार घेतलेली नाही.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित भागांमध्ये मात्र ऊन- पावसाचा खेळ सुरू असेल.
विदर्भ, कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा असतानाच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार असून, यावेळी ताशी 30-40 किमी वेगानं वारेही वाहणार असल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप असली तरीही पावसाच्या जोरदार सरी गोंधळ उडवण्याची शक्यता आहे. गुरुवार, 8 ऑगस्ट 2024 रोजी हवामान विभागानं पुणे, सातारा (घाट क्षेत्र), रायगड, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर इथं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये छत्तीसगढ, तेलंगणा, मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागामध्ये मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेट समूह आणि गुजरातच्या काही भागासह तामिळनाडू, लक्षद्वीप भागांमध्ये हवामान विभागानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.