मुंबई / नगर सह्याद्री –
उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवसांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
उत्तर बांगला देशावरील कमी दाबा क्षेत्र याच प्रदेशावर कायम आहे. ते पुढील ४८ तासांत पश्चिम बंगालच्या पश्चिमेच्या दिशेला सरकण्याची शक्यता आहे. तसेच कर्नाटक- गोवा किनारपट्टीलगत पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एका कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते पुढील २४ तासांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
यामुळे या आठवड्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस राहील. विशेषतः कोकण आणि गोव्यातील काही भागांत पुढील ७ दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
दरम्यान, मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाणे जिल्ह्यात २३ ते२४ ऑगस्ट दरम्यान यलो अलर्ट तर २५ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट राहील. पुणे जिल्ह्याला २४ आणि २५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्याला २४ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.