कुस्तीची स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी: आमदार रोहित पवार काय म्हणाले पहा
पुणे / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निर्णायावरून महाराष्ट्रातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या निर्णयावर आणि एकूणच महाराष्ट्र केसरी स्पर्धा याबाबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कुस्तीची स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी असा खोचक सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही. शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि यंदाच्या स्पर्धेचा अंतिम निर्णय याबाबत रोहित पवार यांनी अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले आहेत.
केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच ‘चितपट’ झाल्याचे चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं असल्याचे ते म्हणाले. अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिली आहे.
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील झालेल्या राड्यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच रोहित पवारांनी तर कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने परवानगी दिली तर पुढच्या महिन्यादच महराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यार असल्याचे सांगितले आहे. पण हे कसं शक्य आहे असा प्रश्न देखील विचारला जात आहे.
महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्ती प्रेमींसाठी अत्यंत उत्सुकतेची स्पर्धा 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा 27 ते 30 मार्च 2025 दरम्यान कर्जत, पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्हा येथे आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा आमदार रोहित दादा पवार आयोजित आणि कर्जत तालुका तालीम संघ (पै. ऋषिकेश धांडे) आणि नगर जिल्हा तालीम संघाच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन मान्यताप्राप्त संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे.
कुस्ती महायुद्धाची तयारी जोमात!
महाराष्ट्र केसरी स्पर्धा म्हणजे राज्यातील कुस्तीगीरांसाठी सर्वोच्च सन्मानाची स्पर्धा. या स्पर्धेत मातीत आणि गादी अशा दोन्ही प्रकारांतील मल्लांमध्ये तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे. राज्यभरातील 36 जिल्ह्यांतील सर्वोत्तम मल्ल या स्पर्धेत आपले कसब आजमावणार असून, यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण ठरणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
संघटनात्मक तयारी आणि भव्य आयोजन
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित दादा पवार यांनी स्वतः विशेष लक्ष घातले आहे. कर्जत तालुका तालीम संघ व नगर जिल्हा तालीम संघ यांनी तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान, उत्कृष्ट निवास व्यवस्था, तसेच खेळाडूंसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दोन प्रकारात कुस्त्या होतील –
1. माती विभाग
2. गादी विभाग
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मल्लांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पात्रतेनुसार जिल्हास्तरीय स्पर्धांमधून निवडले जाईल. विजेत्याला “महाराष्ट्र केसरी” चा प्रतिष्ठेचा किताब आणि मानाचीगदा प्रदान केली जाईल.
दिग्गज मल्लांचा सहभाग – कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी
यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्यातील नामांकित मल्ल सहभागी होणार असून, गतविजेते तसेच युवा पैलवान देखील आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मल्लांना प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि चाहत्यांचे मोठे पाठबळ मिळत आहे. स्पर्धा पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार असून, त्यांच्यासाठी व्यापक सुविधा करण्यात आल्या आहेत. कुस्तीप्रेमींसाठी विशेष ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष कर्जतवर!
27 ते 30 मार्च या चार दिवसांत कर्जतमध्ये कुस्तीचा महासंग्राम रंगणार आहे. महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेचा गौरव राखण्यासाठी व नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी ही स्पर्धा मोलाची ठरणार आहे. 66 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा” म्हणजे मराठमोळ्या कुस्ती परंपरेचा जाज्वल्य उत्सव! कुस्तीप्रेमी, मल्ल, प्रशिक्षक आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही स्पर्धा एक मोठा आनंद सोहळा ठरणार आहे अशी माहिती आयोजकांनी कळवली.