मुंबई / नगर सह्याद्री –
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. हरियाणातील 90 जागांसाठी 1 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये दिवाळीनंतरच निवडणुका घेण्यात येईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना आणखी दोन महिन्यांचा वेळ मिळालाय. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे.
सद्या दोन्ही आघाड्यांकडून निवडणुकीसाठी जोरदार रणनिती आखली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेला सध्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे ही योजना सरकारी असून महिलांनी याचा लाभ घ्यावा. आमचे सरकार सत्तेत आलं, तर आम्ही योजनेचे पैसे वाढवून देऊ, असं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.
अशातच मॅट्रीस सर्व्हे एजन्सीने आणि टाइम्स नाऊने शुक्रवारी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तीन राज्यांमधील मतदारांचा ओपिनियन पोल जारी केला आहे. महाराष्ट्रातील ओपिनिय पोल हा राजकीय नेत्यांची झोप उडवणारा आहे. विधानसभेच्या 288 जागांमध्ये महायुतीची सध्यातरी सरशी दिसत आहे. पण महाविकास आघाडी देखील मागे नाही.
महाराष्ट्रात कुणाचे सरकार येणार?
सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात आजच्या तारखेला जर विधानसभा निवडणूक झाली, तर भाजपला 95 ते 105 जागा मिळतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 19 ते 24 जागा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा मिळतील.
ठाकरे गट किती जागा जिंकणार?
त्याचवेळी, काँग्रेसला 42 ते 47 जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 26 ते 31 जागा आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाला 23 ते 28 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर इतर पक्ष आणि उमेदवार 11 ते 16 जागा मिळतील असा अंदाज आहे.
मतांच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 25.8 टक्के, शिवसेनेला 14.2 टक्के आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 5.2 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 18.6 टक्के, शिवसेना ठाकरे गटाला 17.6, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला 6.2 आणि इतरांना 12.4 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी कडवी झुंज होऊ शकते. येथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यतानाही. मात्र, भाजप आघाडीला 37 ते 42 जागा, काँग्रेसला 33 ते 38 जागा, जेजेपीला 3 ते 8 आणि इतर पक्षांना 7 ते 12 जागा मिळण्याची शक्यता आहे.
झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाला 19 ते 24 जागा, काँग्रेसला 7 ते 12 जागा, भाजपला 38 ते 43 जागा, AJSUP 2 ते 7 जागा आणि इतरांना 3 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात भाजपला 42 जागांसह बहुमत मिळताना दिसत आहे.