अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
घरांच्या छतावर तरणांची मोठी गद, गाण्यांचा दणदणाट आणि उत्साही वातावरणात मकरसंक्रांतीच्या दिवशी नगर शहरासह जिल्ह्यात पतंगोत्सव रंगल्याचे पहावयास मिळाले. अनेकांनी पतंगोत्सवाचा आनंद घेतला. परंतु, याच पतंगोत्सवामध्ये काहींचे पाय, काहींचा हात, काहींचा गळा कापल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्याचे पहावयास मिळाले.
मकरसंक्रातीच्या दिवशी नगर शहरात मोठ्या प्रमाणात पतगोत्सव रंगला. या पतंगोत्सवामध्ये सर्रास तरुणांकडे चायना मांजा दिसून आल्याचे वास्तव आहे. नायलॉन मांजा वारल्याचे दुष्परिणाम शहरातील अनेक नागरिकांना भोगावा लागले. नायलॉन मांज्यामुळे शहरातील अनेक नागरिक जखमी झाले असुन या मांज्यामुळे गळा कापणे, हात पाय डोके कापून गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
सरकारने बंदी घातली असताना देखील नगर शहरात अनेक ठिकाणी मांज्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिकांसहित पक्षी प्राणी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. चायना मांज्यामुळे उड्डाणपुलावर एका युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चिनी मांजाचा वापर टाळावा: आ. जगताप
मकरसंक्रांत निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवणे सुरूच आहे. मात्र यात चायना मांज्याचा वापर होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगत दुचाकी किंवा पायी प्रवास करावा. दुचाकी वाहन चालकांनी उड्डाणपुलावरून जाताना तसेच प्रवास करताना वेग कमी ठेऊन हेल्मेट चा वापर करावा, पालकांनी प्रवास करत असताना चार चाकी गाडीच्या सन रूफ चा लहान मुलांचा वापर टाळावा, काही दिवस प्रवास करताना गळ्याभोवती मफलर चा व जाड कापड गळ्याभोवती गुंडाळावे, तसेच तरुणांनी पतंग उडवताना चायना मांज्याचा वापर टाळावा असे आवाहन आ संग्राम जगताप यांनी केले.
मांजामुळे तीघांनी गमावला जीव
मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी वापर केला जाणारा हा मांजा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी थरकाप उडविणाऱ्या घटना घडल्या आहे. नायलॉन मांजा गळ्याला कापल्यामुळे नाशिक, नंदुरबार आणि अकोला याठिकाणी तिघांनी आपला जीव गमावला. नाशिकमध्ये पाथड गाव चौकाजवळ दुचाकीवरून जाणाऱ्या सोनू धोत्रे (22 वर्षे) या तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला आणि प्रचंड रक्तस्राव झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अकोल्यामध्ये एनसीसी ऑफिसजवळून दुचाकीवरून जाणाऱ्या किरण सोनवणे (35 वर्षे)) हे नायलॉन मांज्यामुळे जखमी झाले. या मांज्यामुळे त्यांचा गळा कापला केला. गळ्याला खोल जखम आणि श्वसन नलिका कापली गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर नंदुरबारमध्ये गळ्याला नायलॉन मांजा कापल्याने कार्तिक गोरवे (7 वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला.