29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आयोजन | जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम जगताप यांची माहिती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 67 व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत दिनांक 29 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2025 दरम्यान वाडियापार्क मैदान, अहिल्यानगर येथे होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप व कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ. पै. संतोष भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरमध्ये तिसऱ्यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असून सकाळ व संध्याळाच्या अशा दोन सत्रात कुस्ती होणार आहेत.यासाठी चार मैदान तयार केली जाणार आहेत. दररोज 200 ते 225 कुस्त्या होतील. अंतिम कुस्ती गादीवर होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. सदर कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेल्या 36 जिल्हे, 6 महानगरपालिका असे एकुण 42 संघ सहभागी होत आहेत.
सदर स्पर्धेत एकूण 840 कुस्तीगीर सहभागी होत असून सदर स्पर्धे दरम्यान 850 ते 900 कुस्त्या होतील. या स्पर्धेत 100 पंच व 80 पदाधिकारी यांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडल्या जातील.यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदिप (आप्पा) भोंडवे व सरविटणीस हिंद केसरी पै. योगेश दोडके अहमदनगर (अहिल्यानगर), उपाध्यक्ष पै. अर्जुन (देवा) शेळके, महाराष्ट्र केसरी पै. अशोक भाऊ शिर्के, महाराष्ट्र केसरी पै. गुलाब बर्डे, सचिव प्रा. डॉ. पै. संतोष भुजबळ, सह सचिव पै. प्रविण घुले, धनंजय खर्से, सोपानराव काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, शहरासह जिल्हयातील सर्व पैलवान आणि वस्ताद मंडळी यांच्या उपस्थित होते.
विजेत्यास चांदीची गदा अन्चारचाकी गाडी
कुस्तीला चांगले वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ः आ. जगताप
नगर शहरासह जिल्ह्यात अनेक मल्ल घडले आहेत. पूव मल्लांना सुविधा मिळत नव्हत्या आता सर्व सुविधा मिळत आहेत. त्यामुळे नवीन पिढीने कुस्ती क्षेत्रात आले पाहिले. अनेक राजकीय मंडळी ही लाल मातीतून आलेली आहेत. आजही ग्रामीण भागात कुस्ती टिकून आहे. जिल्ह्यातील मल्लांनी नगरचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात गाजवले आहे. महाराष्ट्र केसरीचा नावलौकिक राज्यातच न होता राज्याबाहेर व्हावा. कुस्तीला चांगले वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
नगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरमध्ये तिसऱ्यांदा होत आहे. विजेत्या मल्लास चांदीची गदा अणि चारचाकी गाडेी दिली जाणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्य मंत्री पै. मुरलीधर मोहोळ, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंगच आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस उपस्थित राहणार आहेत.
कुस्ती स्पर्धेतील मुख्य आकर्षण
कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफीक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे हे प्रमुख आकर्षण असणार आहे.