Maharashtra Crime News: मगळवारी सकाळी एका तरुणाचा कारमध्ये मृतदेह आढळून आला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे नाव गोविंद बबनराव बर्गे (वय ३५) असून ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसाळा गावचे माजी उपसरपंच होते. गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात प्रेमसंबंधातून ब्लॅकमेल केल्याचे गंभीर आरोप समोर आलेआहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एका कलाकेंद्रात गोविंद बर्गे यांची पूजा देविदास गायकवाड (वय २१, रा. सासुर, ता. बार्शी) हिच्याशी ओळख झाली. पूजा ही त्या ठिकाणी नर्तिका म्हणून काम करत होती. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या नात्याचा वापर करून पूजाने वेळोवेळी पैसे, सोनं, जमीन, मोबाईल (किंमत सुमारे १.७५ लाख) अशा स्वरूपात अनेक आर्थिक फायदे घेतल्याचा आरोप मृताचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे.
फिर्यादीनुसार, काही दिवसांपासून पूजाने गोविंद बर्गे यांच्यावर गेवराईतील बंगला तिच्या नावावर करण्यासाठी आणि पाच एकर शेती भावाच्या नावावर लिहून देण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली होती. त्यावर नकार दिल्यास, तुझ्याशी बोलणार नाही, आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन, अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले होते. सोमवारी रात्री गोविंद बर्गे हे सासुर येथे पूजाच्या घरी गेले होते. त्या दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली होती, असंही समजतं. मात्र, त्यानंतर गावाबाहेर उभी असलेल्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांना मृतदेहाच्या शेजारी पिस्तूल सापडले असून, मृत्यू गोळी लागल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात बार्शी पोलीस ठाण्यात पूजा गायकवाड हिच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस फॉरेन्सिक तपास, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज यांद्वारे घटनेचा सखोल तपास करत आहेत. गोविंद बर्गे हे लुखामसाळा येथे प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. स्थानिक राजकारणात त्यांचा चांगला दबदबा होता. त्यांच्या अचानक निधनाने गाव आणि तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.