Maharashtra Crime News: मुंबई येथे नगररचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपळे यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे असलेल्या वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री कोयता गँगने दरोडा टाकून घरात एकट्या असलेल्या वृध्द महिलेला मारहाण करून व कोयत्याचा धाक दाखवून जवळपास 24 तोळे (23 तोळे 7 ग्रॅम) सोन्याचे दागिने व 60 हजार रुपयांची रक्कम लूटून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील म्होरक्यासह तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. तर अन्य सदस्यांचा शोध सुरू आहे.
ताब्यात घेलेल्या आरोपींची नावे
बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव, (वय 32, रा.चांदेकसारे, आनंदवाडी,ता.कोपरगाव) मयुर उर्फ सोनु दगडू पवार, (वय 25, रा.सावळीविहीर, ता.राहाता), सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे, (वय 25, रा.नगदवाडी, ता.कोपरगाव), सुनील कडू पवार (वय 26, रा.खानापूर, ता.श्रीरामपूर) असे ताब्यात घेलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 4 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आकाश धनु माळी, (रा.नगदवाडी, ता.कोपरगाव), सोहम उर्फ समाधान माळी, रा.कोंची, हे पसार आहेत.
नेमकं काय घडलं?
दि.1 मार्च रोजी रात्री 1 वाजता सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे, (वय 79, रा.खानापूर, ता.श्रीरामपूर) यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात 6 अनोळखी आरोपींनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून, तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील व घरातील जवळपास 24 तोळे सोन्याचे दागीने व 60 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली होती. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दराड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘असा’ लावला सापळा
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 5 मार्च रोजी गुन्हयातील अज्ञात आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे, (रा.नगदवाडी, ता.कोपरगाव) याने त्याच्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे श्रीरामपूर ते पढेगाव रोडने येणार असल्याची माहिती मिळाली. आरोपींचा शोध घेत असताना ते बेलापूर – पढेगाव रोडवर मिळून आले. संशयीत इसमांना ताब्यात घेत असताना पथकाची चाहुल लागल्याने दोन मोटार सायकलवरून 4 इसम पळून गेले. त्याठिकाणी मिळून आलेल्या संशयीत इसमांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांनी ताब्यात घेतले.
4 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
सदर आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्यांचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनिल कडू पवार यांच्या सांगण्यावरून केली असल्याचे सांगितले. दरम्यान, सुनिल हा भोपळे यांच्या शेतातील गडी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचासमक्ष आरोपींची अंगझडती घेऊन त्यांच्याकडून 4 लाख 23 हजार 500 रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या धातुच्या मुर्ती, पांढर्या धातुचे कॉईन, बांगडी, नाकातील नथ, पांढर्या मण्यांचा हार, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, संदीप दरंदले, रमीजराजा आत्तार, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, अरूण मोरे, महादेव लगड यांनी केली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे.