मुंबई / नगर सह्याद्री
एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू करण्याची तयारी केली आहे. लवकरच एसटी प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर बसचे थेट लोकेशन मिळणार असून, यामुळे स्टँडवर बसची वाट पाहण्याची वेळ वाचणार आहे.
एसटी ही अनेक प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र, विशेषत: गावातील किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात बस नेमकी कुठे आहे, हे समजत नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी येतात. बस वेळेवर येईल का, उशीर होईल का, हे माहित नसल्यामुळे प्रवाशांना अनिश्चिततेचा सामना करावा लागतो.
या समस्येचा उपाय म्हणून एसटी महामंडळाने एक नवीन अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील ट्रिप कोडच्या आधारे एसटी बसचे थेट लोकेशन समजणार आहे. व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग (व्हीएलटी) सिस्टिम बसगाड्यांमध्ये बसवल्यानंतर ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. लवकरच ही सेवा सुरू करण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याआधी त्यांच्या बसचे लाईव्ह लोकेशन समजत नव्हते. मात्र, आता ‘व्हीएलटी’ तंत्रज्ञानामुळे बस कोणत्या थांब्यावर किती वाजता पोहोचेल, याची अचूक माहिती मिळू शकणार आहे. प्रवाशांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये अॅप वापरण्याची सुविधा मिळणार आहे.
या अॅपमध्ये ‘ट्रॅक बस’ या पर्यायावर तिकिटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचे थेट लोकेशन समजू शकते. तसेच, एसटी बस मार्गातील इतर थांबे, चालक व वाहकांची माहिती, तसेच अपघात किंवा बिघाड झाल्यास मदतीसाठी थेट यंत्रणेशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. मुंबई सेंट्रल येथील अद्ययावत नियंत्रण कक्षाद्वारे राज्यभरातील एसटी बसवर देखरेख ठेवली जाणार आहे. या सुविधेचा प्रवाशांना मोठा फायदा होईल.