पारनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर
पारनेर | नगर सह्याद्री
शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या थेट खात्यात डीबीटीद्वारे पोहोचतो, मात्र तांत्रिक अडचणींमुळे सामान्य नागरिकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार काशिनाथ दाते यांनी दिले पारनेर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना मोठा लाभ मिळाल्याचे समाधान व्यक्त केलेे.
गुरुवार दि. 24 जुलै रोजी गणेश मंगल कार्यालय, पारनेर येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचवण्याच्या उद्देशाने शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप राज्य परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, सखाराम औटी, तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात कृषी विभागाच्या जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत कडबाकुट्टी आणि बायोगॅस यंत्र वाटप, पशुसंवर्धन विभागामार्फत गाय व शेळी गट वाटप, घरकुल योजनेचे अनुदान, महिला बचत गटांना बँकेमार्फत कर्जवाटप, एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून गरोदर महिलांना बेबी केअर कीट आणि पोषण आहार वाटप करण्यात आला. आरोग्य विभागाने प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत मार्गदर्शन, तर महसूल विभागाने शैक्षणिक साठी आवश्यक दाखले, रेशन कार्ड अद्ययावत करणे, नाव कमी करणे, श्रावणबाळ योजना इ. सेवा दिल्या.
वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईचे लाभ, नगरपंचायतीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, तालुका कृषी विभागाकडून शेती औजारे व कडधान्य प्रक्रिया उद्योग अनुदान, तसेच अपघात सानुग्रह निधी वितरण, परिवहन विभागाने शालेय विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत मोफत बस पास दिले. भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने जमिनीशी संबंधित कामांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांना आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभपत्रांचे वितरण झाले. या शिबिरात आरोग्य, नगरपंचायत, महावितरण, राज्य परिवहन, कृषी, भुमी अभिलेख, महिला व बालकल्याण, संजय गांधी योजना, पुरवठा आदी विभागांचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार
तहसील कार्यालयात विविध रिक्त पदांवर नविन नियुक्त्या करण्यात आल्या असून उर्वरित पदांसाठी लवकरच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाची जी तक्रार वारंवार केली जात होती, ती आता दूर होणार आहे. विशेषतः महिलांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी होऊ नयेत यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी.
-आ. काशिनाथ दाते (विधानसभा सदस्य, पारनेर)