ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल
बीड | नगर सह्याद्री
राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे गंभीर चित्र सर्वांसमोर आले होते. याच काळात महादेव मुंडे यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी मोकाट असल्याचा आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. न्याय मिळत नसल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पुन्हा एकदा विष प्राशन केल्याची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड एसपी कार्यालयासमोर विष प्राशन केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप करून त्यांच्या हातातून ज्वलनशील पदार्थ हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज ज्ञानेश्वरी मुंडे बीडच्या एसपींना भेटल्या होत्या. यावेळी त्यांनी कारवाई न झाल्यास कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला होता.
त्यानंतर काही वेळातच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पुन्हा विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे पती महादेव मुंडे यांच्या हत्येमागे देखील वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे. याच संदर्भात त्यांनी आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्या गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत, यामुळे त्यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.