अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण असून, विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांद्वारे उत्सव साजरा केला जात आहे. शिवमंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर, बनेश्वर, कपिलेश्वर आणि मार्कंडादेव यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये लाखो भक्त दर्शनासाठी येत आहेत. मंदिरे फुलांनी सजवण्यात आली असून, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केल्या आहेत。
अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र बेलेश्वर देवस्थान येथे भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने दाळ मंडई येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरात विधीवत पुजा करुन आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
भवानीनगर नागेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते महाआरती करण्यता आली. ‘हर हर महादेवाचा’ जयघोष करत असताना आपल्याला अनोखी उर्जा मिळत असते, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून आपल्याला लाभलेली परंपरा, संस्कृती अखंडितपणे पुढे चालू राहण्यासाठी आपले सण सर्वांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरे करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सर्जेपूरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरात महाशिवरात्री भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. महादेवाच्या जयघोष करत शीख, पंजाबी समाजातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.सकाळी मंदिरातील शिवलिंगाचा अभिषेक करुन विधीवत पूजा करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता, विश्वस्त व भाविकांच्या हस्ते महादेवाची आरती पार पडली. शहरात महाशिवरात्री निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.