नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे समर्थकांत होणार प्रतिष्ठेचा सामना
सुनील चोभे । नगर सहयाद्री:-
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी गट व गणांची अंतिम रचना जाहीर झाल्याने इच्छुकांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठी इच्छुकांनी मैदान पिंजून काढण्यास सुरुवात केली असून उमेदवारीसाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांची मनधरणी करण्याचे काम चालविले आहे. त्यातच वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच सामना होईल असा अंदाज बांधला जात आहे. अहिल्यानगर तालुक्यात भाजप नेते आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांमध्येच सामना पहावयास मिळणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत संपून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. त्यासाठी गट व गणांची अंतिम रचनाही विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. परंतु, गट-गणांतील आरक्षण अद्याप निघालेले नाही. आपल्याच सोयीचे आरक्षण गट-गणांत निघावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तसेच महायुतीत व महाविकास आघाडीत आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुकांकडून लॉबिंग केली जात आहे.
गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तालुक्यात कर्डिले विरुद्ध नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सामना झाला होता. आता होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे नेतृत्व आमदार कर्डिले व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे तर महाविकास आघाडीचे नेतृत्व प्रा. शशिकांत गाडे व खासदार नीलेश लंके यांच्याकडे राहणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याने तीनही पक्ष एकत्रितच लढतील. तर भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आहे. ही महायुती अहिल्यानगर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत एकत्रिपणे सामोर जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अहिल्यानगर तालुक्यात सहा गट आणि 12 गणांचा समावेश आहे. नवनागापूर गटात देहरे आणि नवनागापूर गण, जेऊर गटात जेऊर आणि बुऱ्हाणनगर गण, नागरदेवळे गटात नागरदेवळे आणि केकती गण, दरेवाडी गटात दरेवाडी आणि चिचोंडी पाटील गण, निंबळक गटात निंबळक आणि चास गण तर वाळकी गटात वाळकी आणि गुंडेगाव गणाचा समावेश आहे.
तालुक्यात भाजप वरचढ; इच्छुकांची तोबा गद
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश आहे. अहिल्यानगर तालुक्यात सध्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्या रूपाने भाजपची ताकद मोठी आहे. शिवसेना शिंदे गटात संदेश कार्ले, शरद झोडगे आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद सर्वश्रूत आहे. त्यामुळे तालुक्यात आमदार कर्डिले यांच्या रूपाने भाजपची सर्वाधिक ताकद असल्याने भाजपकडून निवडणूक लढणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे.
कर्डिलेंना विखेंची तर गाडेंना लंकेंची साथ
गेल्या तीन टर्मपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अहिल्यानगर तालुक्यात कर्डिले विरुद्ध गाडे समर्थकांमध्येच सामना पहावयास मिळतोय. परंतु, होऊ घातलेली निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये होणार असल्याने अहिल्यानगर तालुक्यात महायुतीचे नेतृत्व आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तर महाविकास आघाडीची धुरा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्याकडे असणार आहे. या निवडणुकीत आमदार कर्डिलेंना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची तर प्रा. गाडेंना खासदार नीलेश लंके यांची साथ असणार आहे.