अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची कार्यकारणी जाहीर केली आहे. मूळ जुन्या भाजपशी एकनिष्ठ अशा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या नगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग, तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची निवड करण्यात आली आहे.
२७ एप्रिल रोजी पक्षाने निवडणुकीसाठी नियुक्त केलेले पर्यवेक्षक तथा मंत्री जयकुमार रावल, निरीक्षक लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप व आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये इच्छुकांची चाचपणी करत पदाधिकाऱ्यांकडून कल जाणून घेण्यात आला होता.
त्यानंतर भाजपमधील जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुक असलेल्यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे बंद पाकिटातून धाडली गेली होती. मात्र, त्यावर होणाऱ्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची कार्यकारणी जाहीर केली आहे.
भाजपच्या नगर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग, तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.