अहमदनगर। नगर सहयाद्री
प्रेयसीने ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड, दुचाकी व कागदपत्रे असा ७८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन प्रियकर त्याच्या मित्रासह पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कल्याण रस्त्यावर राहणार्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकर व त्याच्या मित्राविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियकर शुभम ज्ञानदेव काळे (रा. चांदा, ता. नेवासा) व त्याचा मित्र शंकर शिरसाठ (रा. पिंपळगाव टप्पा ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीचा विवाह झाला असून त्यांचे पतीसोबत वाद झाल्याने त्या एकट्याच राहत होत्या. सुमारे चार वर्षापूर्वी त्यांची शुभम काळे याच्याशी ओळख झाली.
त्यांच्यात मैत्री होऊन पुढे प्रेमसंबंध जुळले. ते दोघे सुमारे चार वर्षापासून एकत्र राहत होते. रविवारी (दि. १४) फिर्यादी त्यांच्या गुरू बहिणीसोबत देवदर्शनासाठी तुळजापूर येथे गेल्या होत्या. त्यावेळी शुभम काळे त्यांच्या घरी होता. फिर्यादी सोमवारी (दि. १५) पहाटे दीड वाजता घरी आल्या असता त्यांना घर बंद दिसले. फिर्यादी घरात गेल्या असता त्यांना घरातील मंगळसूत्र, कानातील वेल, झुमके, रोकड तसेच दुचाकी व तिचे कागदपत्रे दिसून आले नाही.
त्यांनी शेजारी राहणार्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता शुभम व त्याचा मित्र शंकर हे दोघे घरात असल्याची माहिती मिळाली. फिर्यादी यांनी दोघांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यांनतर फिर्यादी यांनी मंगळवारी (दि. १६) कोतवाली पोलीस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.