नवी दिल्ली | वृत्तसंस्था-
अखेर भाजपाचा 27 वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्लीतील सत्तेच्या महाकुंभात भाजपाने विजयाचे स्नान केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने बहुमताचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. हाती आलेल्या आकड्यांनुसार, 70 सदस्य असलेल्या विधानसभेत भाजपाने 47 हून अधिक जागी मुसंडी मारली आहे. तर आप 23 जागांवर आपटले आहे. त्यामुळे आप विरोधी गोटात बसणार आहे.
दिल्लीत भाजपाचा 27 वर्षांचा वनवास संपला. भाजपा मोठ्या बहुमताने दिमाखात सत्तेत परतली. आम आदमी पक्षाच्या दिग्गजांची धूळधाण झाली. भाजपाचा विजयासोबतच आपचा मजबूत किल्ला जमीनदोस्त झाला. भाजपाने केवळ विजयच मिळवला नाही, तर मुसंडी मारली. अर्थात दिल्लीतील या विजयाचे खरे शिलेदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानण्यात येते. त्यांनी अखेरच्या सत्रात, तीन दिवसात जी खेळी खेळली तिचा मोठा परिणाम दिसून आला. निवडणुकीचे वारे फिरले. दिल्ली विधानसभा निवडणूक काळातच मोदी सरकारचे बजेट सादर झाले.
गेल्या काही वर्षात मोदी सरकारने मध्यमवर्गाकडे मोठे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नाराजीचा सूर होता. दिल्लीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर मध्यमवर्ग 45 टक्क्यांच्या घरात आहे. नेमका हाच मुद्दा भाजपाने पथ्यावर पाडून घेतला. बजेटमध्ये पगारदार वर्गाचे 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले. तर 75 हजारांचे अतिरिक्त सूट, रिबेट मिळाले. त्यामुळे आपच्या बाजूने झुकलेला मध्यमवर्ग अचानक भाजपाकडे वळला. हीच खेळी गेमचेंजर ठरली. तर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाने भाजपाला मोठी सहानुभूती मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्ली निकालावर पहिली प्रतिक्रिया
“दिल्लीचा चौफेर विकास आणि इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही ही आमची गॅरंटी आहे. यासोबतच आम्ही हेही निश्चित करू की विकसित भारताच्या निर्मितीमध्ये दिल्लीची महत्त्वाची भूमिका असेल”, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांची पराभवावर पहिली प्रतिक्रिया
मी भाजपाला विजयासाठी शुभेच्छा देतो. मला आशा आहे की जनतेच्या विश्वासानुसार भाजपा काम करेल. गेल्या १० वर्षांत आम्ही खूर सारी कामं केली. शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज अशा अनेक बाबतीत आम्ही कामं केली. दिल्लीतील पायाभूत सुविधाही सुधारण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू. आता आम्ही लोकांच्या सुख-दु:खात सोबत राहू – अरविंद केजरीवाल
अमित शाह यांची एक्स पोस्ट
“दिल्लीच्या जनतेनं हे दाखवून दिलंय की जनतेला वारंवार खोट्या आश्वासनांनी फसवलं जाऊ शकत नाही. जनतेनं आपल्या मतांनी दूषित यमुना, पिण्याचं प्रदूषित पाणी, खराब रस्ते, सांडपाण्याची अव्यवस्था आणि प्रत्येक गल्लीत उघडलेली दारूची दुकानं याला उत्तर दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
दिल्लीची केजरीवाल यांच्या तावडीतून सुटका झाली – कुमार विश्वास
“मी दिल्लीतील विजयासाठी भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो. मला आशा आहे की ते दिल्लीच्या लोकांसाठी काम करतील. सामान्य आप कार्यकर्त्यांची स्वप्नं धुळीला मिळवणाऱ्या व्यक्तीबद्दल मला कोणतीही संवेदना नाही. दिल्लीची आता त्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा वापर स्वत:च्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांसाठी केला. आज दिल्लीत न्याय झाला. जेव्हा आम्ही टीव्हीवर मनीष सिसोदियांच्या पराभवाचं वृत्त पाहिलं, तेव्हा माझ्या पत्नीला अश्रू अनावर झाले”, असं कुमार विश्वास म्हणाले.
दिल्लीत काँग्रेसचं अस्तित्व ‘0’
राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसला सलग दिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे आपच्या पराभवापेक्षा काँग्रेसच्या भोपळ्याची सर्वात जास्त चर्चा राजधानीमध्ये होत आहे. सत्ताधारी आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली. २७ वर्षांनतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललेय. तर १० वर्षानंतर केजरीवाल यांच्या आपच्या झाडूचा सुपडा साफ झालाय. २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे तख्त जिंकले, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर मात्र काँग्रेसला पुन्हा दिल्ली काबिज करता आली नाही. इतकेच काय तर साधा एक आमदारही निवडून आला नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये गणित नेमकं कुठं चुकतेय? त्याचं काँग्रेसकडून सिंहावलोकन व्हायलाच हवं. काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं स्वतंत्र विभानसभा निवडणूक लढवली होती. तिहेरी लढतीचा फायदा भाजपला झाला असल्याचं बोललं जात आहे. आप पक्षातील नेत्यांनाही काही जागांवर जबरदस्त फटका बसला आहे. मुख्य म्हणजे आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचाही नवी दिल्लीत ३,१८२ मतांनी पराभव झाला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकींचा आजवरचा इतिहास पाहता २०१३ सालापासून काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. २०१३ साली काँग्रेसने ८ जागांवर विजय मिळवला होता. तर, २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत ८ जागांवर काँग्रेसनं आपला गढ राखला होता. २०२० सालीही ६७ जागांवर निवडणूक लढवूनही काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. यंदाच्या २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं ७० जागांवर निवडणूक लढवली. मात्र, यंदाही काँग्रेसला भोपळा मिळण्याची शक्यता आहे.