अहिल्यानगर । नगर सह्याद्री
महापालिका व आयुक्त यशवंत डांगे जनतेची दिशाभूल करत असून नव्या कचरा गाड्यांच्या माध्यमातून करदात्यांची लूट करत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केला आहे. काही गाड्यांची स्थिती सुरु होण्यापूर्वीच दयनीय झाली असल्याचे गाडे यांनी म्हटले आहे.
महानगरपालिका व आयुक्त यशवंत डांगे यांनी मोठ्या धुमधडाक्यात शहरासाठी 80 नवीन कचरा संकलन गाड्यांचे उद्घाटन केले. माध्यमामधून आयुक्तांनी शहरातील कचर्याचा प्रश्न आता संपला असल्याचे जाहीर केले. महानगरपालिकेच्या खर्चातून नव्हे, तर जनतेच्या कराच्या पैशातून या सर्व कचरा गाड्या विकत घेतल्या गेल्या आहेत.
नगरसेवक योगिराज गाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी या नव्या कचरा गाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. या गाड्यांवरील निळे आणि हिरवे रंग नागरिकांना भ्रमित करण्यासाठी लावण्यात आले आहेत. बाहेरून पाहता, एक बाजू ओल्या कचर्यासाठी आणि दुसरी बाजू सुका कचरा यासाठी असल्याचे दाखवले जाते. पण प्रत्यक्षात, गाडीच्या आत एकही स्वतंत्र कप्पा नाही. ओला आणि सुका कचरा दोन्ही एकाच ठिकाणी एकत्र टाकला जात आहे.
याुळे, नागरिकांची फसवणूक होत असून, हा प्रकार म्हणजे महानगरपालिका आणि आयुक्तांकडून जनतेची दिशाभूल व करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. काही गाड्यांना सायरन, ध्वनी व्यवस्था व इतर आवश्यक सुविधा उपलब्धच नाहीत. शहराला स्वच्छ करण्यासाठी किमान 130 पेक्षा अधिक गाड्यांची आवश्यकता असल्याचे गाडे यांनी म्हटले आहे.



