अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर तालुयातील रस्त्यांचे भूसंपादन झाल्याने बरीच लवाद प्रकरणे प्रलंबित आहेत. यात नगर तालुयातील बर्याच गावांचा समावेश आहे. सध्या एएमएस कंन्सलटन्सीकडून शेतकर्यांची लुटमार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. एएमएस कंन्सलटन्सीच्या नावाने बाबासाहेब भाऊसाहेब आबूज ही व्यक्ती स्वत:ला स्वयंघोषित वकील आणि कायदेशीर सल्लागार म्हणून शेतकर्यांमध्ये जाहीर करत आहे. आबुज याने केलेल्या प्रकाराबाबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार गोरख दळवी यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, एएमएस कंन्सलटन्सी काय आहे, त्याचे चालक कोण आहेत. कायदेशीररित्या अस्तित्वात असल्याबाबतच्या कागदपत्रांची शहानिशा होणे आवश्यक आहे. बाबासाहेब आबूज याच्याकडे वकीली करण्यासाठी कायद्याची कोणतीही पदवी नाही. तरी देखील तो लवाद प्रकरणातील वकीलपत्रांवर एएमएस कंन्सलटन्सीचे शिक्के मारून त्यावर वकील म्हणून सह्या करत आहे. प्रचलित कायद्यानुसार कोणाचीही न्यायीक बाजू मांडण्यासाठी वकीलांना बार कौन्सिलमध्ये पदवी पूर्ण झाल्यानंतर रजिस्टेशन करणे आवश्यक आहे.
आबूज याच्याकडे अशा प्रकारची कोणतीही कागदपत्रे नाहीत. आबूज याने भूसंपादित शेतकर्यांकडून जादा रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने पाइपलाईनचे मुल्यांकन वाढवून घेण्यासाठी ३५ टक्के हिस्सेवारी/ कमिशन तसेच शेतजमिनीचे मुल्यांकन वाढवून घेण्यासाठी १५ टक्के हिस्सेवारी/ कमिशन ठरवले आहे. त्यासाठी त्याने तत्कालीन भूसंपादनासाठी आवश्यक असणार्या सर्व अधिकार्यांना हाताशी धरून गैर प्रकार केल्याचे समोर येत आहे. त्यासाठी बाबासाहेब आबूज याने जमीन संपादीत शेतकर्यांकडून कोरे चेक व त्या अनुषंगाने शंभर रूपयांच्या बॉण्ड पेपरवर नोटरी देखील करून घेतली आहे.
या प्रकारात सामान्य शेतकरी गुरफटलाजात आहे. सदरच्या प्रकाराबाबत योग्य ती कारवाई करावी. असा प्रकार करण्यासाठी एएमएस कंन्सलटन्सीला कायद्याने कोणता अधिकार दिला आहे, याचा खुलासा व्हावा. तसेच बाबासाहेब आबूज याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा गोरख दळवी यांनी दिला आहे.