अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तपोवन रोडवरील गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. 2 जून 2025 रोजी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.फिर्यादी प्रमोद रामदास घोडके (रा. ढवणवस्ती, तपोवन रोड) हे औषध घेण्यासाठी गेले असताना, आरोपींनी त्यांना तु ऋषी ढवणसोबत का राहतो? या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.
त्यानंतर भिमराज आव्हाड याने पिस्टलमधून दोन राउंड फायरींग केले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटकेत घेतल्यानंतर दोन मुख्य सूत्रधार फरार होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व त्यांच्या टीमने तांत्रिक विलेषणाद्वारे पुण्यातील केसनंद येथे आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला.
दि. 15 जून 2025 रोजी पुण्यातील केसनंद येथे सापळा रचून आरोपी भिमराज गेणुजी आव्हाड (वय 58, रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) व राहुल विजय सांगळे (वय 33, रा. शिवनगर, सावेडी, अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली. आरोपी भिमराज आव्हाड याच्यावर पूव मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून तो जामिनावर आहे. तर राहुल सांगळे याच्यावर दंगा व मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
दोन्ही आरोपींना तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करून पुढील तपास सुरु आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने ही कामगिरी पार पाडली.