अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
एका पत्र्याच्या खोलीत कत्तलीच्या उद्देशाने डांबलेल्या गोवंश जातीच्या १८ जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका केली आहे. पथकाने छापा मारुन ८ लाख १० हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेतली. याप्रकरणी फैजान इद्रिस कुरेशी, सुफियान उर्फ गुल्लु इद्रिस कुरेशी, शोएब अब्दुलरऊफ कुरेशी, सर्व ९ ( रा.झेंडीगेट, अहिल्यानगर ) यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर धडक कारवाईचे आदेश पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, पंकज व्यवहारे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, रविंद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, आकाश काळे, अशांचे पथक रवाना केले.
काही इसमांनी बाबा बंगाली चौकीजवळील सरकारी शौचालयाच्या शेजारी एका पत्र्याच्या खोलीत कत्तलीच्या उद्देशाने गोवंशी जातीचे जिवंत जनावरे डांबुन ठेवलेले असल्याची माहिती पथकाला गस्तीदरम्यान मिळाली. त्यानंतर पथकाने पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला.
तिथे निर्दयीपणे, दाटीवाटीने गोवंश जातीचे १८ जनावरे पथकाला दिसले. पथकाने अधिक विचारपूस केली असता फैजान इद्रिस कुरेशी, सुफियान उर्फ गुल्लु इद्रिस कुरेशी, शोएब अब्दुलरऊफ कुरेशी यांची असल्याची माहिती मिळाली. त्यांनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.