संगमनेर / नगर सह्याद्री –
“राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने थातूरमातूर उत्तर दिलं. आयोगाचं उत्तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे. कोणतीही चौकशी केली नाही. खुलासा केला नाही. महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत” असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. आज मनसे आणि महाविकास आघाडीने मतचोरीच्या मुद्यावर भव्य मोर्चा काढला आहे.
“विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरू नका, असं आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं. आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना सांगितलं. आम्ही सर्वजण होतो. लोकशाही मानणारे सर्वच आले पाहिजे, असा आमचा आग्रह होता. आम्ही गेलो. उत्तर मिळालं नाही. अनेक उदाहरणं दिली” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
“नगर पालिकेसाठी मतदार याद्या जाहीर केल्या. विधानसभेच्या मतदार यादीत घोळ आहे. बोगस लोकांची नोंद आहे. ते तसेच ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, अशी आपली मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला की काय असं वाटतं” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.



