Kisan Credit Card Scheme: केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक योजना पुढे आणली आहे. “किसान क्रेडिट कार्ड (KCC)” या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार असून, त्यावर केवळ ४ टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी सर्वात स्वस्त आणि सुलभ कर्ज योजनेपैकी एक मानली जात आहे.
कृषीमंत्री आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ही मर्यादा ३ लाखांवरून वाढवून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, २ लाखांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेतून केवळ बियाणं, खते, औषधं खरेदीच नाही, तर कापणीनंतरचा खर्च, पशुपालन, घरगुती गरजा, शेतीसंबंधित यंत्रसामग्री यासाठीही कर्ज घेता येते.
सरकार या योजनेत २ टक्के व्याज अनुदान देते, तसेच वेळेवर हप्ते फेडल्यास ३ टक्के व्याज सवलत दिली जाते. परिणामी, शेतकऱ्यांना फक्त ४ टक्क्यांत कर्ज उपलब्ध होतं. हे कार्ड एक प्रकारचं डिजिटल डेबिट कार्ड आहे. शेतकरी या कार्डाचा वापर ATM, मोबाईल अॅप, किंवा बियाणे-खत विक्रेत्याच्या POS मशीनवरून करू शकतात. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेता, ही योजना अधिकाधिक तंत्रज्ञान-साक्षर होत आहे.
कर्जाची रक्कम ठरवताना शेतकऱ्याची जमीन, लागवडीचा खर्च, आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर भांडवली मदत मिळून शेतीचा दर्जा आणि उत्पादनक्षमता वाढू शकते . या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या पुढाकारामुळे शेतीला आर्थिक आधार मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.