अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान (सोमवारी) पार पडले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या चुरशीचा सामना पहावयास मिळाला.
तर शिर्डी मतदारसंघात महायुतीचे सदाशिव लोखंडे, महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्यात चुरशीचा सामना पहावयास मिळाला. किरकोळ प्रकार वगळता जिल्हाभरात मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली.
अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे अहमदनगर व शिर्डी असे दोन मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात एकूण ३ हजार ७३४ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली.शिर्डीत मतदारसंघात १६ लाख ७७ हजार ३५५, तर अहमदनगरमध्ये १९ लाख ८१ हजार ८५५ हजार मतदारांची संख्या होती.
मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.अनेक गावात चुरशीने मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. मतदान घडवून आणण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत होते.
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीनिमित्त रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय व सावेडीतील महात्मा ज्योतिबा फुले शाळा हे दोन आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. या ठिकाणी मतदारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रीय पाठशाळा येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी आयटीआय कॉलेजमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके दुचाकी वरून मतदान केंद्रांना भेटी देत माहिती घेत होते.
शहरात ठीक ठिकाणी मतदान केंद्रावर मोठी गर्दी पहावयास मिळत होती. महापालिकेच्या वतीने मतदारांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिका प्रशासन मतदान जास्तीत जास्त घडावे यासाठी प्रयत्न करत होते.
देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. या उत्सवाचा चौथा टप्पा पार पडला. अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदान केंद्र क्रमांक २८८ कुरकुंडी येथे नवरदेवाने बोहल्यावर चढण्याआधी मतदान हक्क बजावला.
नगर मधील सेंट सेवियर हायस्कूलमध्ये काजल गुरु यांच्यासह सुमारे 100 तृतीयपंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
हॉटेल्स हाऊसफूल
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विखे विरुद्ध लंके यांच्यात चुरशीचा सामना पहावयास मिळाला. दरम्यान, मतदारांना खूश करण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी जेवणावळीचा बेत आखला होता. शनिवारी व रविवारी हॉटेल्स हाऊसफूल होते.
लक्ष्मी दर्शन!
कधी नव्हे ती यंदाची लोकसभा निवडणूक सुजय विखे व नीलेश लंके यांच्यात मोठ्या चुरशीची झाल्याची पहावयास मिळाली. दरम्यान रविवारी रात्री गावोगावी लक्ष्मी दर्शन झाल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्याचे वयोवृद्ध सांगत आहेत.
बहिरोबावाडीत शासनाचा निषेध करत मतदान
अहमदनर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात बहिरोबावाडी येथे शेतकरी रामदास लाळगे यांनी शासनाचा जाहीर निषेध करत गळ्यात कांद्याची माळ घालून तसेच दूध रस्त्यावर ओतून शेतकर्यांनी मतदान केले. दूधाला व कांद्याला भाव मिळत नसल्याने निषेध नोंदवला हा चर्चेचा विषय ठरला.