पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर-नगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या राज्य विधीमंडळात आमदार काशिनाथ दाते सर यांनी ठामपणे मांडत सरकारच्या धोरणांवर अंमलबजावणीत सुधारणा करण्याची मागणी केली. बुधवार, 16 जुलै रोजी चालू अधिवेशनात संयुक्त प्रस्ताव (नियम 293) अंतर्गत झालेल्या चर्चेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतली.
गोदावरी खोऱ्यातील जलसंधारण प्रकल्पांवर न्यायालयाच्या जनहित याचिकेमुळे घातलेली बंदी 41 गावांच्या शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरत असून, 27 हजार हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येण्याची संधी गमावली जात आहे, असे त्यांनी सांगितले. या बंदीमुळे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, शासनाने औरंगाबाद खंडपीठात फेर याचिका दाखल करून बंदी उठवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
प्लास्टिक फुलांच्या वाढत्या वापरामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे बाजारभाव कोसळले आहेत, हे वास्तव त्यांनी अधिवेशनात मांडले. आझाद मैदानावरील फुल उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा ही परिस्थितीची गंभीरता दर्शवणारा असल्याचे सांगत, प्लास्टिक फुलांच्या उत्पादन व वापराबाबत नवीन धोरण आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पारनेरमधील मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेले पाच सौर ऊर्जा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच, वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतात सौर युनिट बसवण्यासाठी एजन्सीकडून होणारा विलंब आणि विज वितरण कंपनीकडून कनेक्शन नाकारले जाणे, ही परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर शासनाने त्वरित लक्ष घालून वीज पुरवठा सुनिश्चित करावा, अशी आग्रही मागणी दाते सरांनी केली. त्यांचे हे सडेतोड आणि विधायक पर्याय सुचवणारे भाषण शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारे ठरले असून, मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेती व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा: आ. दाते
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे शेतकरीहिताच्या निर्णयांसाठी अभिनंदन. तसेच राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती व्यवसायाच्या हितासाठी शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी होत असताना, येणाऱ्या अडचणींवरही मार्ग काढला पाहिजे असे मत आ. काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडले.