संगमनेर । नगर सहयाद्री:-
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात बिबट्याच्या मुक्त संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास बिबट्याने गावानजीकच्या आहेर क्लॉथ स्टोअर्स दुकानासमोर तब्बल दीड तास ठिय्या ठोकला. हल्ल्याची शक्यता लक्षात घेता बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा. अशी मागणी भाजपचे युवा नेते अमोल बाळासाहेब दिघे यांनी केली आहे.
तळेगाव दिघे परिसरात गेल्या काहीमहिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. यापूर्वी या परिसरात वन विभागाने पिंजरे लावून बिबटे जेरबंद केले आहेत. रात्रीच्या सुमारास बिबटे मुख्यतः कुत्र्यांना भक्ष्य करीत आहेत. शनिवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास गावानजीकच्या संगमनेर रस्त्यालगत आहेर क्लॉथ दुकानासमोरील असलेल्या स्टोअर्स पायरीवर बिबट्याचे दर्शन झाले. तब्बल दीड तास बिबट्याने दुकानाच्या पायरीवर ठाण मांडले. बिबट्याच्या सर्व हालचाली दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत, असे अक्षय आहेर यांनी सांगितले.
सद्यस्थितीत परिसरात रब्बी हंगामातील पिके उभी आहेत. मात्र, बिबट्याच्या मुक्त संचाराने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीपिकांना पाणी भरणे मुश्किल होत आहे. दिवसा वीज उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. मात्र बिबट्या केव्हा हल्ला करील याचा भरवसा उरला नाही. साहजिकच शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यापूर्वी मेंडवन शिवारात बिबट्याने एका महिलेवर हल्ला ठार केले होते.
सर्वत्र बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात बिबट्याचापिंजरा लावावा, अशी मागणी भाजपचे युवा नेते अमोल दिघे, अॅड. मयूर दिघे, अक्षय आहेर यांसह ग्रामस्थांनी केली आहे.



